परभणी शहर व परिसरात १० जून रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाला होता. या पावसाने गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्याच्या परिसरात पावसाच्या पाण्याने पूर आला होता. यातच काम सुरू असलेल्या वळण रस्त्याचा काही भाग ढासळला होता. तसेच रस्त्याचा अंदाज न आल्याने सिमेंट घेऊन येणारा ट्रक परिसरात आडवा झाला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प झाली होती. याच दिवशी या मार्गावरील गंगाखेडकडे जाणारी वाहतूक साखला प्लॉट, लोहगाव मार्गे सिंगणापूरकडे वळविण्यात आली. ११ ते २३ जूनच्या दरम्यान केवळ दुचाकी व छोट्या वाहनांना पिंगळगड नाल्यावरील नव्या पुलावरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आठ दिवसापासून नवीन पुलावरून छोट्या वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत जुना ढासळलेला भाग संबंधित विभागाने व कंत्राटदाराने दुरुस्त केला नाही. तसेच त्याचा भराव बाजूला करुन डागडूजी केली नाही. अजून चार ते पाच दिवस या रस्त्याने केवळ छोटी वाहने ये-जा करण्यास परवानगी आहे. या कालावधीत तरी हे काम पूर्ण होणार का ? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
दोन ठिकाणी पोलीसांची तपासणी
शहरातील उड्डाणपूल परिसरातून परळी रेल्वे गेटकडे जाणाऱ्या साखला प्लाँटमार्गे गंगाखेडकडे जाणारी जड वाहने वळविण्यात आली आहेत. यासाठी येथे पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच सिंगणापूर येथेही थेट परभणी शहरात जड वाहने येऊ नयेत, याकरिता पोलीसांनी बँरिकेंटिंग उभारली आहे. यामुळे जड वाहनांना पिंगळगड नाल्यावर थेट प्रवेश मिळण्यास बंदी कायम आहे.