गंगाखेड शहरातून जात असलेल्या नांदेड- पुणे महामार्गावर बसस्थानकाजवळ असलेल्या पालम नाका फाटक रेल्वे वाहतुकीदरम्यान दिवसातून अनेक वेळा बंद राहतो. त्यामुळे २००८ साली येथे उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मंजुरीच्या चार वर्षांनंतर २०१२/२०१३ साली रेल्वे रुळावर ३४ मीटरचा ओलांडणी ढाचा तयार करण्यात आला. या ढाच्याच्या दोन्ही बाजूंनी पोचमार्ग जोडण्यासाठी औरंगाबाद येथील ए.जी. कन्स्ट्रक्शनला ३० जानेवारी २०१६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. उड्डाणपूल पोचमार्ग जोडण्याचे रेखाचित्र, तसेच केलेल्या कामाचे बिल वेळेवर मिळत नसल्याने काम रखडले व पोचमार्ग जोडणीच्या कामाला दोन वर्षांऐवजी चार वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. रेल्वे उड्डाणपुलाचे काम चालू असल्यामुळे येथून काढलेल्या पर्यायी मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना येथील खड्ड्यांबरोबर वाहतुकीच्या खोळंब्याचा, तसेच अडचणींचा सामना करावा लागत आहे. १३ वर्षांच्या कालावधीनंतर आज रोजी या रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र, या कामाचे रेखाचित्र तसेच निधी वेळेवर मिळत नसल्याने उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने अंतिम टप्प्यात असलेले काम पूर्ण होण्यासाठी आणखीन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरही जोपर्यंत कामाचे पैसे मिळत नाहीत. तोपर्यंत पुलावरून वाहतूक सुरू होणार नाही, असे उड्डाणपुलाचे काम पाहणाऱ्या व्यवस्थापनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची प्रतीक्षा केव्हा संपणार, असा संतप्त सवाल वाहनधारकांसह शहरवासीयांतून उपस्थित केला जात आहे.
सुधारित प्रस्तावातील
कामांची मंजुरी रखडली
गंगाखेड येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सर्वप्रथम मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत २००८ मध्ये १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे २०१२/२०१३ मध्ये २२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यात सिमेंटचे गडर, एम ४५ काँक्रीट, सिमेंटचा सर्व्हिस रोड, नाली आदी वाढलेली कामे या निधीतून होणे शक्य नसल्याने उड्डाणपुलाचे काम, तसेच पूल परिसरात अंदाजे ६०० मीटरचा सिमेंट काँक्रीट सर्व्हिस रोडच्या कामासाठी ४७ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. यातील बहुतांश कामांना अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नसल्याने काम रखडले आहे. सुधारित प्रस्तावातील सर्व कामांना मंजुरी मिळताच उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळेल व काम लवकर पूर्ण होईल, असे ए.जी. कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक सलमान मणियार यांनी सांगितले आहे.