तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या या बनवस गावांमध्ये आतापर्यंत उपकेंद्रात आरोग्य सुविधा दिल्या जातात.चाटोरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बनवस येथे उपकेंद्र कार्यरत आहे. या गावची वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधेसाठी होणारी तारांबळ लक्षात घेऊन या ठिकाणी आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली. त्याचबरोबर केंद्राच्या इमारतीलाही निधी उपलब्ध झाल्याने इमारत बांधकाम सुरू झाले. १० जानेवारी २०१७ रोजी प्रत्यक्ष इमारत बांधकामाला सुरुवात झाली. जानेवारी २०१९ पर्यंत या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला दिली होती; मात्र मुदत संपून दोन वर्षे उलटले तरीही या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या भागातील आरोग्याची सुविधा ग्रामस्थांना अद्याप उपलब्ध झाली नाही. उपकेंद्र कार्यरत असले तरी त्या ठिकाणी पुरेसे कर्मचारी, औषध साठा उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर आजारावर आणि तातडीने उपचार घेण्यासाठी येथील ग्रामस्थांना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर गाठावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पावले उचलली; मात्र प्रशासकीय दप्तर दिरंगाई येथील आरोग्य केंद्राची इमारत रखडली आहे. अद्याप इमारतच बांधून पूर्ण झाली नसल्याने आरोग्य केंद्र अंतर्गत मंजूर पदे कर्मचाऱ्यांची नियुक्ती व इतर भौतिक सुविधांसंदर्भात कोणतीही पावले उचलली नाहीत. परिणामी, बनवससह परिसरातील इतर गावातील जवळपास २५ हजार ग्रामस्थांच्या आरोग्य सुविधा अजूनही टांगणीला आहेत.
लेखी आश्वासन देऊनही दोन वर्षांचा कालावधी उलटला
बनवस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डेबिटवार यांनी जानेवारी २०१९ पर्यंत बांधकाम पूर्ण केले जाईल, असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले होते; मात्र बनवस ग्रामस्थांना अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनालाही आज दोन वर्षे पूर्ण झाले आहेत; मात्र अद्यापही याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी, चार ते पाच महिन्यांपासून छोट्याशा उपकेंद्रांमध्ये हे आरोग्य केंद्र चालविले जात आहे.
सुविधांअभावी शहरांकडे धाव
बनवस हे गाव तीन जिल्ह्याच्या सीमेवरील गाव आहे. या गावापासून पालम २५ किमी, गंगाखेड ३० किमी, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर २८ किमी आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका ३० किमी अंतरावर आहे. गंभीर आजाराच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी या गावातून रुग्ण शहराकडे धाव घेतात.