पाथरी (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी मंजुरी मिळालेल्या ६४ सिंचन विहिरींपैकी ५८ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांवर जिओ टॅगींग करून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ९१ सिंचन विहिरीला नव्याने मान्यता देण्यात आली आहे.
मनरेगा योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत़ योजनेच्या अंमलबजावणीसाठीही दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने छाननी समितीची मंजुरी अनिवार्य केली होती़ छाननी समितीच्या बैठका वेळेत होत नसल्याने दोन वर्षांत कामे सुरू होवू शकली नव्हती़ गतवर्षी छाननी समितीने ६५ सिंचन विहिरींना मान्यता दिली होती़ या कामांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर आता पंचायत समितीस्तरावरून कामे सुरू झाली आहेत़ ५८ सिंचन विहिरींच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांचे जिओ टॅगींग करण्यात येऊन कामाला सुरुवात झाली आहे.
योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक मान्यता व कामाचे अंतिमीकरण करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांनी मनरेगाच्या कामासाठी अधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत़ पाथरी, मानवत, सेलू या तीन तालुक्यांसाठी तांत्रिक मान्यता पूर्णत्वाचे दाखले देण्यासाठी जिंतूर येथील लघुसिंचन उपविभागाचे उपअभियंता बी़व्ही़ मिरासे यांच्या नावाने आदेश काढले आहेत़ त्यामुळे नवीन ९१ कामांना तांत्रिक मान्यता देण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़
छाननी समितीची १७९ कामांना मान्यतामनरेगा योजनेंतर्गत कार्यरत असणार्या उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीने १७९ कामांना मान्यता दिली आहे़ यात अमृतकुंड शेततळे ०९, निर्मल शौचालय २७, विहिर पुनर्भरण ५२, अहिल्यादेवी सिंचन विहिर ९१ या कामांचा समावेश आहे़
२६ प्रस्तावात त्रुटी
पाथरी पंचायत समितीने छाननी समितीकडे सिंचन विहिरींचे प्रस्ताव सादर केल होते़ त्यापैकी १७९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ तर २६ प्रस्ताव आढळून आले आहेत़ तर दोन प्रस्ताव अपात्र ठरले गेले आहे़
कुशल-अकुशलची देयके अडकली
योजनेच्या कामांना तालुकास्तरावर नव्याने सुरुवात झाली असली तरी मागील कामांचे कुशल देयके सहा महिन्यांपासून आॅनलाईन उपलब्ध झाले नाहीत़ आता तर गेल्या १५ दिवसांपासून अकुशल देयके आॅनलाईन उपलब्ध झाले नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीस अडचणी निर्माण होत आहेत़
अंमलबजावणी सुरू झाली आहे़मनरेगा अंतर्गत छाननी समितीने मंजुरी दिलेल्या सर्वच कामांची पंचायत समितीस्तरावरुन अंमलबजावणी सुरू झाली आहे़ वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.- बी.टी. बायस, गटविकास अधिकारी, पाथरी
कामांना गती आली आहे़ मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांना आता चांगली गती आली आहे़ सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनही कामाला लागले असून, मंजुराना काम व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे़ योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- शिवकन्या ढगे, सभापती, पंचायत समिती