परभणी : दर्गा रोड भागातील अमरधाम, हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम २ जुलै रोजी सुरू करण्यात आले. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील ३० वसाहतींची गैरसोय दूर होणार आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील संजय गांधीनगर येथील राज्य बियाणे महामंडळाकडून अमरधाम, हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. अमरधाम, स्मशानभूमी ते श्री पाइप कॉर्नरपर्यंत हा रस्ता केला जाणार आहे. मनपा शिक्षण सभापती विकास लंगोटे, नगरसेविका शेख अकबरी बेगम शेख साबेर यांच्या अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधीमधून हे काम होत आहे. प्रभाकर लंगोटे, विकास लंगोटे, शेख आबेद मुल्ला, ॲड. अमोल पाथरीकर आदींसह प्रभागातील नागरिक बशीर खान, अमीर खान, शेख जब्बारभाई, शेख बशीर शेख फरीद, संतोष गिरी, शमशू हाश्मी, शिवाजी गिराम, परमेश्वर जैस्वाल, मोहन कांबळे, लुकमान खान, निसार अन्सारी, मोतीराम वटाणे, रुस्तूम वाकळे आदी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता.