ताडबोरगाव : वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कार्यारंभ आदेश मिळूनही ताडबोरगाव- सोमठाणा या रस्त्याचे काम सुरु झाले नाही. परिणामी या रस्त्यावर येणाऱ्या आठ गावांना तब्बल १२ कि.मी.चा वळसा घालून जिल्ह्याचे शहर गाठावे लागत आहे. मानवत तालुक्यातील ताडबोरगाव -सोमठाणा हा साडेपाच किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. २१ वर्षांपूर्वी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळामार्फत १६ लाख रुपये खर्च करून या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले होते . हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग असून, परिसरातील आठ गावांना हा मार्ग वाहतुकीसाठी सोयीचा आहे. २१ वर्षांत या रस्ताची एकादाही दुरुस्ती झालेली नसल्याने सध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून, रस्त्यावरील गिट्टी ठिकठिकाणी उघडी पडली. यामुळे या मार्गावरून दुचाकी चालविणेदेखील जिकरीचे झाले आहे. परिसरातील आठ गावांतील नागरिकांना परभणीला जाण्यासाठी कोल्हा पाटी येथून बारा किलोमीटर अंतराचा वळसा घालून जावे लागत आहे. अपव्यय होत आहे. विशेषता या भागात आरोग्यविषयक सेवा उपलब्ध नसल्या कारणाने रुग्णास परभणी येथे उपचारासाठी घेऊन जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या भागातील ग्रामस्थांच्या मागणीवरून साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्ता कामास फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तसेच या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या; परंतु, कोरोना साथीमुळे निविदाप्रक्रिया रखडली होती. तद्नंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेशही देण्यात येऊनही अद्यापही कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही . याबाबत अभियंता रवी शिराढोणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत. दरम्यान, या रस्ताचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.
आठ गावांना होणार लाभ
सध्या रस्ताची दुरवस्था झाल्याने या गावातील नागरिकांना कोल्हा पाटीमार्गे ताडबोरगाव गाठावे लागते. या मार्गाचे काम झाल्यास सोमठाणा, आटोळा, कोथाळा पार्डी, शेवडी जहांगीर, नरळद, नीलवर्ण टाकळी, राजुरा या आठ गावांचे परभणीचे अंतर तब्बल बारा किलोमीटरने कमी होणार आहे. या आठ गावांना हा साडेपाच किलोमीटरचा मार्ग ताडबोरगाव येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. यामुळे वेळेची बचत होऊन वाहतूक सुलभ होणार आहे.