परभणी : शहर महानगरपालिकांतर्गत कार्यारंभ आदेश देऊनही विकासकामे सुरू होत नाहीत. त्याचबरोबर मनपा प्रशासनाकडून मूलभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शहरवासीयांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वात मंगळवारी परभणी - गंगाखेड या महामार्गावर सकाळी ११:०० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शांतीनिकेतन कॉलनी, माऊली चौक ते राजे संभाजी गुरुकुल या भागात आयटीआयपासून येणारे घाण पाणी थांबवून नाला काढून देण्यात यावा, काकडेनगर भागात रस्त्याचे काम सुरू करावे, प्रसादनगर कॉर्नर - कृषीनगर मुख्य रस्ता तत्काळ तयार करण्यात यावा, त्याचबरोबर कार्यारंभ आदेश दिलेले आरोग्य दवाखाना ते कॅनलपर्यंत रस्त्याचे काम सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी म्हाडा कॉलनी, बाबर कॉलनी, कृषीनगर, मुनीम कॉलनी, पंचशीलनगर, पंचवटीनगर, विकासनगर, शांतीनिकेतन कॉलनीमधील नागरिकांनी एकत्र येत १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता परभणी - गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात माणिक पोंढे, रामा कुलथे, अशोक गिराम, प्रल्हादराव शिंदे, मोहन टाक यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन मनपा प्रशासनाला सादर करून आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.