शहरासह जिल्ह्यात महालक्ष्मीचा सण घरोघरी उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त लक्ष्मीची मखर व कोथळ्यांमध्ये आरास मांडली जाते. अनेक जण नवीन मखर तसेच काेथळ्या तयार करून त्यांची पूजा करतात. महालक्ष्मीची मुखवटे, वस्त्र व अन्य पूजेचे साहित्य दरवर्षी नवीन घेतले जाते. शहरातील स्टेडियम परिसर, वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड या भागात मखर आणि कोथळ्या बनविणारे विक्रेते मोठ्या प्रमाणात बसले आहेत. त्यांच्याकडे मागणीप्रमाणे कोथळ्या बनवून घेतल्या जात आहेत. यात मागील वर्षी २ मोठ्या व दोन छोट्या कोथळ्यांचे दर १५०० रुपये होते. हेच दर यंदा कच्च्या मालाचे दर वाढल्याने २१०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
सजावटीसाठी लागणारे मखर आणि पडदे यांची दुकानेही थाटली आहेत. शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर या परिसरात काही दुकानांमध्ये हे साहित्य उपलब्ध आहे. महिला वर्गाची या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.