येथील श्री केशवराव बाबासाहेब महाराज यांची दरवर्षी दत्त जयंतीला यात्रा महोत्सव असतो. दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी या कालावधीत येतात. तसेच मंदिर परिसरात देशभरातून व्यावसायिक विविध खेळणी, घरगुती वस्तू, खाद्य पदार्थ, राहट पाळणे, लहान बालकासाठी खेळ, लोकनाट्य तमाशा मंडळ आदी दुकाने, मनोरंजन आदी कार्यक्रमाची रेलचेल असते. त्यामुळे दहा दिवस शहरातील रस्ते गर्दीने फुलून जातात. यात्रा महोत्सवाच्या माध्यमातून छोटे- मोठे व्यावासायिकांची लाखों रूपयांची उलाढाल होते. यंदा २२ डिसेंबरपासून यात्रा महोत्सवाला प्रारंभ होणार होता. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने यात्रा महोत्सवाला परवानगी दिली नाही.
पालखी मिरवणूक ,धार्मिक कार्यक्रमाला परवानगी
सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचा यात्रा महोत्सव २२ डिसेंबरपासून सुरु होणार होता. मात्र कोरोना संसर्ग लक्षात घेऊन व नागरिकांची गर्दी टाळण्याच्या हेतूने, प्रशासनाने यात्राैत्सवास परवानगी नाकारली आहे. तसेच नागरिकांची गर्दी टाळून व कोरोना संसर्गाची काळजी घेऊन प्रतिवर्षीप्रमाणे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. अभिषेक, महापूजा भागवतकथा, कीर्तनाचे आयोजन करता येईल. भागवत कथा व कीर्तन याचे ऑनलाईन आयोजन केल्यास गर्दी होणार नाही. त्याशिवाय यात्रा महोत्सवातील मुख्य कार्यक्रम म्हणजे पालखी सोहळा, ३० डिसेंबर रोजी आहे. यासाठी ट्रॅक्टरमध्ये पालखी सोहळा साजरा करता येईल. मात्र यात भाविकांना सहभागी होता येणार नाही. प्रत्येक भाविकांनी आपल्या घरासमोर पालखीचे दर्शन व पूजन करता येईल. कोरोना संदर्भातील सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.