येलदरी (ता.जिंतूर) : बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण १०० टक्के भरले असून, या धरणाच्या १० पैकी ४ दरवाजे उघडण्यात आले असून, ११ हजार १४० क्यूसेक पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे.
खडकपूर्णा धरणाच्या १९ पैकी ११ दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी येलदरी धरणात दाखल होत आहे. तसेच पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने येलदरी धरणही १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात पाण्याची लक्षणीय आवक सुरु आहे.
हेही वाचा - स्टंटबाजी तरुणांच्या अंगलट; पुराच्या पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांना तहसीलदारांचे समन्स
पाणी पातळीत वाढ होत असल्याने ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता या धरणाचे १, ५, ६ आणि १० दरवाजे उघडण्यात आले असून, त्याद्वारे ८४३९.८१ क्यूसेस पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे. त्याचप्रमाणे येलदरी प्रकल्पाच्या जलविद्युत केंद्राच्या तीन संचाद्वारे २७०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. या प्रकल्पातून सध्या १११३९.८१ क्यूसेस पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे.