औरंगाबाद : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जिंतूर (जि. परभणी) तालुक्यातील येलदरी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने परभणी जिल्ह्यासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.
जिंतूर तालुक्यातील येलदरी हे या भागातील सर्वात मोठे धरण आहे. ९३४ दलघमी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या उपयुक्त जलसाठा नावालाही शिल्लक नाही. मृतसाठ्यामध्ये १०५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.येलदरी धरणात मोठा गाळ साचला आहे. तो काढण्यासाठी आतापर्यंत कुठलीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे या मृतसाठ्यात पाणी कमी आणि गाळ अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात अर्ध्या मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
परभणी, जिंतूर, पूर्णा, हिंगोली आदी शहरांसह ग्रामीण भागातील अनेक गावांची तहान या पाण्यावरच भागते. या प्रकल्पात पाणी नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी दुधना प्रकल्पातून पाणी घेण्यात आले होते. उन्हाळा अद्याप बराच दूर असताना हे चित्र आहे.