जिल्ह्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. याचा फटका बँकांच्या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेलादेखील बसला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील या वर्षीची ६० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात २०२१-२२ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १,२१३ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. २५ जूनपर्यंत जिल्ह्यातील खासगी, व्यावसायिक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ५१ हजार ७०४ शेतकऱ्यांना २५६ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत २१ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. कोरोना काळात संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला बँकांनी तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज निर्माण झाली.
जिल्हा बँक पोहोचली ९९ टक्क्यांवर
परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना जिल्हा प्रशासनाने ७८१ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी २५ जून पर्यंत या बँकांनी ७ हजार २४९ शेतकऱ्यांना ६९ कोटी ११ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत केवळ ८ टक्के पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. तर दुसरीकडे १०१ कोटी १८ लाख रुपयांचे खासगी बँकांना पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले असतानाही या बँकांनी केवळ ३३९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार ७३० शेतकऱ्यांना ४० कोटी ६४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत २१ टक्के पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँके शाखेला १४२ कोटी ८३ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना या बँकेने आतापर्यंत ३९ हजार शेतकऱ्यांना १४२ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत ९९.६१ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.