गंगाखेड ( परभणी ) : सततच्या नापिकीला कंटाळुन शहरातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी धारखेड शेत शिवारात घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील धनगर गल्ली येथील रहिवाशी रोहिदास नारायण भुमरे वय ६८ वर्ष यांना धारखेड शिवारात सर्व्हे नंबर १८ मध्ये साडे आठ एक्कर शेती आहे. प्रत्येकी दिड एक्कर प्रमाणे पाच मुलांना शेतीची वाटणी करून दिली आहे. त्यांचा मोठा मुलगा सखाराम रोहिदास भुमरे वय ३४ वर्ष याने सतत होणाऱ्या नापिकीला कंटाळुन शुक्रवारी दुपारी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, जमादार हरिभाऊ शिंदे, दत्तराव पडोळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी रोहिदास नारायण भुमरे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद पोलीस डायरीत करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, वृद्ध आई, वडील, चार भाऊ असा परिवार आहे.