पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून परभणी-वसमत मार्गावरील हट्टा फाटा येथे वाहनाची वाट पाहत असताना रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या पिता व पुत्राला दुचाकी चालकाने हलगर्जीपणाने दुचाकी चालवून धडक दिल्याची घटना ४ एप्रिल रोजी घडली होती. धडकेनंतर दुचाकीचालक आपली दुचाकी (क्रमांक एम. एच. ३८, ए. ए. ५७४९) जागीच सोडून पळून गेला होता. या धडकेत पंजाब गोमा चव्हाण (१९, रा. भटसावंगी, जि. हिंगोली) हा गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचासाठी परभणी व त्यानंतर नांदेड येथे हलविण्यात आले होते. एका खासगी रुग्णालयात १० एप्रिलपर्यंत त्याच्यावर उपचार करण्यात आले. दवाखान्याचे पुढील पैसे नसल्याने नाईलाजास्तव त्यास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवित असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी मृताचे नातेवाईक गोमा सेवा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक गुट्टे हे करीत आहेत.