परभणी : सोशल मीडियाच्या अभासी जगातून बाहेर पडून वास्तव परिस्थिती स्विकारावी. कोणत्याही मोहाला बळी न पडता विद्यार्थ्यांनी स्वत:चे कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून वागावे, असे आवाहन सुरेश शेवाळे यांनी केले आहे.
येथील बी.रघुनाथ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १३ जानेवारी रोजी आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी डॉ.दशरथ इबतवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरेश शेवाळे म्हणाले, युवकच राष्ट्राचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांनी अभ्यास, वाचन, परिश्रमातून स्वतःला योग्यरीत्या घडवावे. आपले आई -वडील, गुरुजन यांचे ऐकावे, जे जे आपल्या अहिताचे आहे त्या सर्वांचा त्याग करावा आणि जे हिताचे आहे ते स्वीकारावे. समाजसेवेसाठी तत्पर राहावे, पर्यावरण संवर्धनासाठी कृतीशील प्रयत्न करावेत, असे आवाहन हिवाळे यांनी केले. सुरेश भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.मदन ठाकूर, संजीवनी बारहाते, अभिषेक गायकवाड आदींनी प्रयत्न केले.