परभणी : जिल्ह्यातील युवकांनी आता आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. आपला शेजारी देश चीनने मोठी प्रगती केली आहे. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी युवकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने करून स्वत: आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन प्राचार्य विठ्ठल घुले यांनी केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पदवीस्तर प्रथम वर्ष कला, विज्ञान आणि पदव्यत्तर स्तरावरील प्रथम वर्ष भूगोल व मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी येथील बी. रघुनाथ महाविद्यालयात ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य घुले बोलत होते. यावेळी समन्वयक प्रा.डॉ. हेमा माकणे, उपप्राचार्य डाॅ. ज्ञानोबा ढगे, प्रा.डॉ. भगवान शेंडगे, प्रा.डॉ. मिलिंद बचाटे, प्रा. भगवान काळे, प्रा.डॉ. माधव पाटे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.डॉ. अपर्णा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी ‘मानवी मू्ल्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. आदर्श विद्यार्थी कसा असावा, प्राप्त परिस्थितीमध्ये मानवी मूल्ये विद्यार्थ्यांनी पुढे नेली पाहिजेत, असे ते म्हणाले. भागवत आरमळ यांनी राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती आणि कागदपत्रांची पूर्तता अभासी पद्धतीने कशी करायची, या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. भगवान काळे यांनी विविध खेळ आणि स्पर्धांची माहिती दिली. प्रा.डॉ. राजेश देशमुख यांनी विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रमाचा अहवाल वाचून दाखविला. डॉ. आरशिया परवीन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. हेमा माकणे यांनी आभार मानले.