परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:34 PM2018-10-31T12:34:04+5:302018-10-31T12:35:25+5:30
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले.
परभणी : सत्ता स्थापन करुन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने आज युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले.
भाजपाने निवडणुकीपूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली. केंद्रात सरकार स्थापन होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरीही आश्वासने पूर्ण केली नसून, सर्वसामान्य नागरिकांची शासनाने फसवणूक केल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज हे आंदोलन केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते सकाळी १० वाजेच्या सुमारास एकत्र आले.
शिर्षासन, मयुरासन, मत्स्यासन, पद्मासन आदी वेगवेगळे आसने करुन कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा निषेध नोंदविला. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रसचे नागसेन भेरजे, प्रणित खजे, प्रक्षित सवणेकर, वसिम कबाडी, शेख दिलावर, दिगंबर खरवडे, राम जाधव यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते या 'निषेधासन' आंदोलनात सहभागी झाले होते.