जिल्हा परिषदेमध्ये ‘स्वच्छ माझे कार्यालय’ हे अभियान आता राबविले जात आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच कार्यालयांमध्ये स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत. ६ जानेवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी सर्व शिक्षा अभियान, महिला व बालकल्याण विभाग या कार्यालयांना भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी केली. त्याचप्रमाणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांच्यासह दोन्ही कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जि.प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी जि.प.अंतर्गत विविध उपाययोजना आणि कामांना सुरुवात केली. वेगवेगळ्या विभागांच्या बैठका घेतल्या जात असून, त्यात त्या त्या विभागांनी केलेल्या कामांचा आढावा घेऊन टाकसाळे अधिकाऱ्यांना सूचना करीत आहेत. केवळ कार्यालयातील बैठकांवरच भर न देता ग्रामीण भागात दौरे करून प्रत्यक्ष कामाची पाहणीही त्यांनी आतापर्यंत केली आहे.
त्याचप्रमाणे आता कार्यालयांची स्वच्छता करण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विभागामध्ये असलेले जुने दस्तावेज व्यवस्थित ठेवणे, त्यांच्या कालक्रमानुसार संचिका तयार करणे, कोणताही दस्तावेज लगेच उलपब्ध होईल, अशा पद्धतीने मांडणी करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छता मोहिमेबरोबरच आता कार्यालयीन स्वच्छतेवरही भर देण्यात आला असून, ‘स्वच्छ माझे कार्यालय’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.