लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : ‘ईच्छा तेथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे मानवत तालुक्यातील नागरजवळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी लॉकडाऊनच्या काळातील आपला वेळ सार्थकी लावत ‘गुगल ट्रान्सलेटर ॲप’च्या माध्यमातून जपानी भाषा अवगत केली आहे. आज या विद्यार्थिनी मराठीप्रमाणे जपानी भाषा फाडफाड बोलत आहेत.
पुणे जिल्ह्यातील वाभळेवाडी जिल्हा परिषद शाळेचा अभ्यास पॅटर्न राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांसाठी आदर्शवत ठरला आहे. याच वाभळेवाडी पॅटर्नचा आदर्श घेऊन मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी लॉकडाऊनच्या काळात जपानी भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद राहू नये, या भूमिकेतून गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्या्ध्यापक सुभाष तुरे, शिक्षक विकास जुक्टे, राजकुमार पांचाळ यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यानंतर या विद्यार्थिनींनी गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून जपानी भाषेचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अ्भ्यासगट तयार केला. ‘गुगल मीट’च्या माध्यमातून या विद्यार्थिनी एकमेकांशी जपानी भाषेतून संवाद साधू लागल्या. प्रारंभी गुजराती व जपानी भाषेत संवाद शिकवण्यासाठी वुई लर्न इंग्लिशचे धडे त्यांनी गिरविले. त्यानंतर जागतिक स्तरावरील एखाद्या तरी वेगळ्या भाषेवर आपले प्रभुत्व असावे, या दृष्टीकोनातून त्यांनी जपानी भाषेची निवड केली व या भाषेची बाराखडी गिरविण्यास सुरुवात केली. प्रारंभी लहान वाक्य, त्यानंतर कविता, गीते आदींचा जपानी अनुवाद त्यांनी केला. गटचर्चेतून यात त्यांना यश मिळत गेले. अशक्य काहीच नाही, फक्त परिश्रमाला सातत्याची गरज लागते, हा यशाचा मूलमंत्र ओळखून त्यांनी जपानी भाषा शिकण्याचा केलेला पण पूर्ण केला. आज या विद्यार्थिनी मराठी भाषेप्रमाणे जपानी भाषा फाडफाड बोलत आहेत. त्यांचे हे शैक्षणिक यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
या विद्यार्थिनींनी अवगत केली भाषा
श्रुती होगे, भाग्यश्री देंडगे, उषा होगे, रोहिणी गोगे, प्रियंका होगे, ऋतुजा होगे, ज्ञानेश्वरी होगे, कोमल होगे, साक्षी होगे, अश्विनी होगे, प्रतीक्षा होगे, भक्ती होगे, वैष्णवी होगे, ओंकार होगे, श्रुती होगे.