लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवरुन वाद झाल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची गुरुवारी होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेत गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या कक्षात पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर बरीच वादावादी झाली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या ७२ गावांवर यावेळी सदस्यांनी आक्षेप घेतला. सीईओं बी.पी.पृथ्वीराज यांनी सदस्यांना विश्वासात न घेता गावांची निवड केली असल्याचा आरोप उपस्थित पदाधिकाºयांनी केला. त्यावर पृथ्वीराज यांनी निकषामध्ये बसणाºया गावांचीच आपण निवड केली, असे सांगितले. यावेळी काही सदस्यांनी गावांची निवड करताना सदस्यांशी चर्चा करणे आवश्यक होते, असे सांगितले.या विषयावरुन वातावरण गरम झाल्यानंतर काही सदस्यांनी वैयक्तिक विषयही बैठकीत मांडण्यास सुरुवात केली. तत्कालीन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी अभियंता दादेवाड यांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत बदली केली होती. ती बदली रद्द करुन दादेवाड यांना परत जिल्हा परिषदेत घ्यावे, यासाठी काही सदस्य गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत; परंतु, सीईओं पृथ्वीराज हे त्यास तयार नाहीत. गुरुवारच्या बैठकीतही हा विषय आला; परंतु, सदस्यांची मागणी पृथ्वीराज यांनी फेटाळली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसूकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार वरिष्ठ अभियंता खान यांच्याकडे देण्याचा पृथ्वीराज यांनी निर्णय घेतला; परंतु, काही सदस्यांनी इतर अभियंत्यांची नावे सूचविली. त्यालाही पृथ्वीराज यांनी नकार दिला. त्यामुळे या बैठकीत चांगलीच गरमागरमी झाली. शेवटी उपस्थितांनी गुरुवारची स्थायी समितीची बैठक स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषद:स्थायी समितीची बैठक स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:40 AM