- मोहन बोराडे सेलू (परभणी): कठोर परिश्रम, वेळेचे अचूक नियोजन, प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर डॉ. पवन रंगनाथ खेडकर या एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. शहरातील सर्वोदय नगरमध्ये राहणारे जिपचे सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ खेडकर यांचा पवन धाकटा मुलगा असून त्याच्या यशाने सेलूच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
डाॅ. पवनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील नूतन शाळा व महाविद्यालयात झाले. तर मुंबई येथील जेजे वैद्यकीय काॅलजेमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेत रूजू झाला. २०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून डाॅ.पवनने प्रशासकीय सेवेत जाण्याच्या निश्चय केला.
त्यानंतर वैद्यकीय सेवा, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून डॉ. पवनने युपीएससी परिक्षेची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, क्लास न लावता. सेल्फ स्टडी आणि ऑनलाईनवर साहित्य यावर त्याने यशाचे शिखर गाठले. पवनने २०२१ मध्ये युपीएससीची परिक्षा दिली होती. त्यानंतर तो प्रतीक्षा यादीत ६० क्रमांकावर होता. मंगळवारी जाहीर झालेल्या प्रतिक्षा यादीतील निकालात त्याची अखेर निवड झाली.
यशामागे आई-वडिलांची प्रेरणाआई-वडिलांचे संस्कार, शिस्त यामुळे हे यश मिळू शकले. मराठवाडय़ातील विद्यार्थांकडे चांगली गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यामुळे या भागातून सर्वाधिक डाॅक्टर, इंजिनिअर होतात. माञ स्पर्धा परीक्षेसंदर्भात आपल्याकडे जागृती नाही. गुणवता असलीतरी त्याची जाणीव कमी असल्यामुळे युपीएससीकडे कल कमी आहे. इतर क्षेत्रापेक्षा प्रशासकीय सेवेतून अधिक चांगल्या प्रकाराने सेवा करता येते. लोकांना न्याय देता येतो. - डॉ. पवन खेडकर