हनुमान जयंती विशेष - महाराष्ट्रातील एकमेव निद्रावस्थेतील भ्रदा मारुती By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 06:45 PM 2023-04-05T18:45:32+5:30 2023-04-05T18:51:52+5:30
देशभरात 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाते, यंदा गुरुवारी सर्वत्र साजरी होत आहे. आपल्या गावातील, घराशेजारील किंवा शहरातील हनुमान मंदिरात या दिवशी भक्तांची मोठी गर्दी असते. देशभरात उद्या म्हणजे 6 एप्रिल हनुमान जयंती साजरी केली जाते. आपल्या गावातील, घराशेजारील किंवा शहरातील हनुमान मंदिरात या दिवशी भक्तांची मोठी गर्दी असते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हनुमान जयंतीचं वेगळ महत्व आहे. कारण निद्रिस्त अवस्थेतील महाराष्ट्र राज्यातील एकमेव मारुती मंदिर हे येथील खुलताबाद येथे आहे.
खुलताबाद येथील हे मंदिर श्री. भद्रा मारुती संस्थान नावाने राज्यात प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर खुलताबाद हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे हनुमान जयंतीला भक्तांची मोठी गर्दी असते.
देशभरात गावोगावी हनुमानाची मूर्ती उभ्या अवस्थेतील पाहायला मिळते, पण खुलताबाद येथील भद्रा मारुतीची मूर्ती मात्र निद्रिस्त म्हणजेच, झोपलेल्या अवस्थेतील आहे.
भद्रा मारुतीप्रमाणेच निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद तर दुसरे खुलताबाद. तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे.
भद्रा मारुतीबद्दलही एक पुराणकथा सागितली जाते. त्यानुसार, येथील मारुती निद्रीत अवस्थेत का आहे, हे कोडं उलगडतं.
त्रेतायुगात श्रीराम भक्त असलेला भद्रसेन नावाचा एक राजा येथे राज्य करायचा. भद्रसेन राजा श्रीरामाचा निस्सीम भक्त असल्याने तो सतत रामभक्तीत तल्लीन असायचा. तसेच भद्रकुंडाजवळ बसून तो रामधून गात असे.
एकदा असेच हनुमान या परिसरातून जात असताना त्यांच्या कानी भद्रसेन राजाची रामधून पडली. रामधूनेतील माधुर्य आणि आतर्ता पाहून हनुमानजी भावविभोर झाले. हुनमान हे रामधून ऐकण्यात इतके तल्लीन झाले की, त्यांना निद्रावस्था प्राप्त झाली.
जेव्हा भद्रसेन राजाची रामधून संपली तेव्हा हनुमानजी अतिशय भावविभोर स्थितीत निद्रावस्थेत असल्याचे दिसले. त्यावेळी हनुमंतानी राजास वर मागण्यास सांगितले.
तेव्हा, आपण येथेच राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात, अशी इच्छा भद्रसेन राजाने व्यक्त केली. त्यावर, तथास्तू म्हणत बजरंगबली अंतर्धान पावले, अशी आख्यायिका आहे.