Sharad Pawar : 'हे' फोटोच सांगतात, पवारांनी निलेश लंकेंचं 'वजन' वाढवलं By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 03:49 PM 2021-10-04T15:49:19+5:30 2021-10-04T16:28:54+5:30
Sharad Pawar : शरद पवार यांनी लंकेच्या घरी भेट देत एकप्रकारे लंके आपल्या किती जवळचे कार्यकर्ते आहेत, हेच दाखवून दिलंय. त्यामुळे, नगरमध्ये राष्ट्रवादीचा मोठा चेहरा म्हणूनही आता लंकेकडे पाहिल्यास नवल वाटता कामा नये अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार ४६ कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते.
अहमदनगरमधील विकासकामांचा लोकार्पण सोहळा पवार-गडकरी जोडीमुळे लक्षवेधी ठरला. त्यानंतरही, शरद पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे हा सोहळा चर्चेचा विषय बनला आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही लंके यांच्या पारनेर तालुक्यातील हंगा येथील घराला भेट दिली.
आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेले काम देशपातळीवर चर्चेत आले होते. तसेच लंके यांचा साधेपणा, त्यांचे साधे घर यावरही चर्चा झाली होती. शरद पवार यांनी थेट लंके यांच्या 2 खोल्यांच्या घरी भेट दिली.
पवारांच्या या भेटीमुळे कार्यकर्तेही भारावले. लंकेच्या अत्यंत साध्या घरात पवार गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते. लंकेच्या घरात शरद पववार होते, तर दारात कार्यकर्त्यांच मोठी गर्दी जमा झाली होती.
पवार यांच्या बाजुला आमदार लंके यांचे आई-वडिल होते, त्यांचीही पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी लंके यांच्या मुलीनेही शरद पवार यांच्याशी संवाद साधला.
लंकेंच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाबाबत पवारांनी विचारपूस केली. यावेळी, कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हेही हजर होते. पवार यांच्या या दौऱ्यामुळे आमदार लंकेचं जिल्ह्याच्या राजकारणातील वजन चांगलंच वाढलय.
निलेश लंके यांच्याविरुद्ध महिला तहसिलदाराने आरोप केले होते, त्यावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ सातत्याने लंकेंना टार्गेट करत आहेत. तर, यापूर्वी स्थानिक मनसेच्या नेत्यानेही आमदार लंकेंविरुद्ध तक्रारी केल्या होता.
शरद पवार यांनी लंकेच्या घरी भेट देत एकप्रकारे लंके आपल्या किती जवळचे कार्यकर्ते आहेत, हेच दाखवून दिलंय. त्यामुळे, नगरमध्ये राष्ट्रवादीचा मोठा चेहरा म्हणूनही आता लंकेकडे पाहिल्यास नवल वाटता कामा नये
पवारांची ही भेट नगर जिल्ह्यासाठी आणि पारनेरसाठी लक्षवेधी ठरली. लंकेच्या छोट्याशा घराबाहेर मोठा फौजफाटा आणि लोकांचा मेळाच जमला होता.
पवारांचे फोटो काढण्यासाठी, गर्दीत एखादा सेल्फी घेण्यासाठीही अनेकांची धडपड दिसून येते होती. पण, पवार यांनी लंकेंच्या घरी सर्वांचीच विचारपूस केली, अधिक वेळही व्यतीत केला.
या दौऱ्यात नगरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही उपस्थित होते.
नगर जिल्ह्यात नेहमीच पवार विरुद्ध विखे पाटील असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यातच, पवारांनी आता सर्वसामान्य आणि कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसलेला चेहरा जिल्ह्यातून पुढे आणल्याचेच या दौऱ्यातून दिसून येईल.