... म्हणून कोविड सेंटरला शरद पवारांचं नाव, निलेश लंकेंनी सांगितलं राज'कारण' By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:38 PM 2021-05-14T15:38:30+5:30 2021-05-14T15:54:20+5:30
लंके यांच्या या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवार यांनी घेतली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. त्यातील शंभर बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे.
प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे दिले जात आहे. निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं आहे. तसेच निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे.
लंके यांनी या कोविड सेंटरला आरोग्य मंदिर असं नाव देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव दिलंय. विशेष म्हणजे लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहेत.
पारनेरमधील या कोविड सेंटरला शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर हे नाव का दिलं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, लंकेंनी शरद पवार यांचं नाव देण्यामागील भावना आणि प्रेरणा बोलून दाखवली.
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा धावून कोण गेलं. 1993 साली किल्लारीला भूकंप झाला, तेव्हा धावून कोण गेलं.
दोन वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूरला महापूर आला, तेव्हाही हा 80 वर्षांचा योद्धाच धावून गेला. म्हणजे, ज्यावेळेस संकट आलं तेव्हा शरद पवारच धावून गेले आहेत.
आपल्याला काटा टोचला तर आपण म्हणतो, आई sss गं.. आणि जर एखादा नाग दिसला तर आपण म्हणतो बाप रे...
शरद पवार हे आपल्यासाठी वडिलांच्या जागी आहेत, महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा ते आधार देतात. म्हणूनच मी या कोविड सेंटरला शरद पवार यांचं नाव दिलं.
हे कोविड सेंटर नसून आरोग्य मंदिर आहे, अशा शब्दात आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांचे नाव देण्याचं कारण स्पष्ट केलं.
मंदिरात गेल्यावर प्रत्येकाला समाधान वाटतं, तसंच या कोविड सेंटर किंवा आरोग्य मंदिरात आल्यानंतर प्रत्येक रुग्णाला समाधान वाटलं पाहिजे, ते कोरोनाला विसरुन गेले पाहिजेत, अशी संकल्पना असल्याचंही लंके यांनी म्हटलंय.
लंके यांच्या या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवार यांनी घेतली होती.