Bharat Series Numbers Apply : माहितीयेत काय आहेत भारत सीरिज नंबर प्लेट्स?; पाहा कसा करता येईल अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 04:28 PM2022-04-13T16:28:23+5:302022-04-13T16:39:57+5:30

Bharat Series Numbers Applty : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) भारत सीरीज नंबर प्लेट्स सादर करण्यात आल्या होत्या. बीएच नंबर सीरिजसाठी नोंदणी सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झाली.

Bharat Series Numbers Applty : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) भारत सीरीज नंबर प्लेट्स सादर केल्या होत्या. बीएच नंबर सीरिजसाठी नोंदणी सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झाली.

अनेकदा आपल्याला कामानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वास्तव्यास जावं लागलतं. अशा वेळी वाहनांची नोंदणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करण्याचं ओझं कमी करण्याच्या विचारानं BH नंबर सीरिज सुरू करण्यात आली.

उदाहरणार्थ, जर DL नंबर प्लेट असलेली कार दिल्लीमध्ये नोंदणीकृत असेल तर ती इतर कोणत्याही राज्यात फक्त १२ महिने चालवता येते. मालकाने नवीन राज्यात जाण्याचा निर्णय घेतल्यास, त्याला त्या राज्यात वाहनाची नोंदणी करावी लागेल. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ४७ अंतर्गत अशी तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय तुम्ही अनेकदा पाहिले असेल की रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटवर MH, HR, UP, MP असं लिहिलेलं असतं. या नंबर्सचा अर्थ राज्याच्या नोंदणीनुसार असतो. आता वाहनांच्या प्लेटवर भारत सीरिजसाठी BH असं लिहिलं जाईल.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेली ही सीरिज ऐच्छिक आहे आणि अनिवार्य नाही. भारत सीरिजमधील नंबर प्लेट्स काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या असतील. यामध्ये पांढऱ्या रंगाचं बॅकग्राऊंड असेल आणि त्यावर काळ्या रंगात क्रमांक लिहिलेला असेल. प्लेटवरील क्रमांक BH ने सुरू होईल आणि ज्या वर्षात नोंदणी झाली त्या वर्षाचे शेवटचे दोन अंक त्यात असतील.

'वन नेशन वन नंबर' अंतर्गत BH सीरिज नंबर असलेली वाहनं भारतात कुठेही चालवता येतात. पहिला क्रमांक '21 BH 0905A' उत्तर प्रदेशात जारी करण्यात आला. ज्यामध्ये २१ म्हणजे २०२१ वर्ष, BH म्हणजे भारत वर्ष मालिका, ०९०५ म्हणजे वाहन क्रमांक, A म्हणजे A ते Z अल्फाबेट सीरिज.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते, ही सुविधा संरक्षण कर्मचारी आणि केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. सार्वजनिक वाहन आणि खाजगी क्षेत्रातील वाहन कंपनीसाठीही ही सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे.

राज्य सरकार, केंद्र सरकार, संरक्षण, खाजगी संस्थांशी संबंधित कर्मचारी ज्यांची कार्यालये ४ पेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. भारत सीरिज नंबर प्लेट घ्यायची की नाही हे त्या वाहनाच्या मालकावर अवलंबून असेल.

यासाठी अर्ज करायचा असल्यास रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या https://morth.nic.in/en वेबसाइटवर जा आणि वाहन पर्यायावर क्लिक करा. याशिवाय, नवीन वाहन घेताना BH-SERIES नंबर प्लेटसाठी देखील अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला फॉर्म २० आणि फॉर्म ६० भरावा लागेल. तुम्ही खाजगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर फॉर्मसोबत एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट, आयडी यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.