आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:00 AM 2024-05-24T11:00:37+5:30 2024-05-24T11:05:56+5:30
First Time Car Buying Tips: घरही घ्यायचे असते, कारचे स्वप्नही पुर्ण करायचे असते. यामुळे पहिली कार घेतानाचा निर्णय चुकला तर, महागाईच्या जमान्यात उगाचच मोठी कार घेतली तर, अशा अनेक गोष्टी नंतर नुकसानीत जायला भाग पाडतात. आज अनेकजण त्यांच्या आयुष्यातील पहिलीच कार खरेदी करतात. आई-वडिलांनी कष्ट करून शिकविलेले असते, मिळेल ते काम पत्करून तरुण-तरुणी आपले करिअर घडवत असतात. नोकरीनिमित्ताने गावाकडून शहराकडे आलेले असतात. त्यांना घरही घ्यायचे असते, कारचे स्वप्नही पुर्ण करायचे असते. यामुळे पहिली कार घेतानाचा निर्णय चुकला तर, महागाईच्या जमान्यात उगाचच मोठी कार घेतली तर, अशा अनेक गोष्टी नंतर नुकसानीत जायला भाग पाडतात.
डीलरचे काय तो विकायलाच बसला आहे. अनेक कंपन्या आहेत, त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या कारचा ताफा आहे. तुम्हाला त्यातून एक तुमच्यासाठी चांगली कार निवडायची आहे. परंतु ही घेऊ की ती घेऊ असे करता करता अचानक एवढे गांगरून जायला होते की अनेकजण चुकीची कार घेऊन बसतात. आज आम्ही तुम्हाला पहिली कार कशी निवडायची ते सांगणार आहोत.
सर्वात महत्वाचे म्हणजे रिसर्च. पहिल्यांदा कार घेणारे बऱ्याचदा कार बाबत अभ्यास करत नाहीत. मायलेज, सेफ्टी, बसण्याची क्षमता आणि किंमत आदी गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. तुमच्यासाठी गरजेची फिचर्स आणि गरज नसलेली फिचर्स कोणती आहेत ते ठरवायला हवे. असे न केल्यास तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात.
नवी कार की जुनी... दुसरी महत्वाची बाब म्हणजे नवीन कार घ्यायची की जुनी हे देखील ठरवायला हवे. नवीन कार जास्त काळ फायद्याच्या राहतात. परंतु जर तुमचे बजेट कमी असेल तर जुनी चांगली कार निवडणे फायद्याचे आहे. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म जुन्या कार उपलब्ध करतात. त्यांच्या किंमतीही थोड्या जास्तच असतात. यामुळे ओळखीच्या व्यक्तीकडून, डीलरकडून कार घेणे फायद्याचे ठरू शकते.
एखादी कार दिसायला चांगली आहे, लुक जबरदस्त आहे यावर भाळू नका. ती कार तुमच्या व्यावहारिक गरजा पूर्ण करते का याचा विचार करा. जेवढी महाग कार तेवढा तिचा मेन्टेनन्स, विमा आणि वॉरंटी आदीसाठी जास्त पैसा खर्च करावा लागतो.
कारची टेस्ट ड्राईव्ह घेणे गरजेचे आहे. रस्त्यावरील व्हिजन, डॅशबोर्ड लेआऊट, सस्पेंशन, तुमच्या उंचीला योग्य आहे का, स्टेअरिंग-इंजिन रिस्पॉन्स, एसीचे कुलिंग, लाईट थ्रो आदी गोष्टी पाहणे गरजेचे आहे. जुनी कार असेल तर ती घेण्यापूर्वी ओळखीच्या चांगल्या मेकॅनिकला दाखवायला विसरू नका.
डीलरचा सेल्सपर्सनच्या भुलथापांना बळी पडू नका. त्याच्याशी सावधगिरीने चर्चा करा. अन्य पर्यायांवरही विचार करा. सर्व्हिस सेंटर जवळ आहे का, तुम्ही नेहमी प्रवास करता त्या मार्गावर कुठे कुठे सर्व्हिस सेंटर आहे, स्पेअर पार्टची अव्हेलेबिलिटी आदी गोष्टी पहा.
जर फायद्याची डील डीलर देत नसेल तर तिथून खालीहाथ परतण्याची मानसिक तयारी ठेवा. डीलर काय म्हणेल, लोकांना काय वाटेल याची काळजी करू नका. शेवटी हप्ते तुम्हालाच भरायचे आहेत. डीलर किंवा लोक भरणार नाहीत. यामुळे घ्यायचीच आहे, या आवेशात गेल्यात मोठ्या चुका होऊन बसतात. तुम्ही घायकुतीला आलेले आहात हे त्यांना लगेचच समजते व बकरा बनविले जाते.