Car Care Tips: होळी आहे! कार रंगली तरी चालेल, पण मूड खराब करू नका; आजच हे करा... By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:45 AM 2022-03-17T11:45:25+5:30 2022-03-17T11:56:24+5:30
Holi 2023: Protect Car from colours आजच घरी गेल्या गेल्या या गोष्टी करा, म्हणजे उद्या तुम्हाला त्याचे टेन्शन येणार नाही. कारच्या रंगाचा बेरंग होणार नाही. जाणून घ्या काही टिप्स. होळीच्या रंगात सारे दंग होऊन जाणार आहेत. कोरोनामुळे गेली दोन वर्षे फारशा उत्साहात होळी साजरी करता आली नाही. परंतू आता देशातून कोरोनाचे सावट दूर झाले आहे. काळा, हिरवा, पिवळा, लाल असे नानाविध नाना प्रकारचे चिकटणारे रंग तुम्ही आज आणणार असाल. पिचकाऱ्या, फुगे आदी फेकणार त्यातून तुमच्यावर रंग कमीच उडेल परंतू तुमच्या वाहनांवर खूप रंग उडणार आहे.
यामुळे कारचा रंग खराब होण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर रस्त्यावर होळी खेळणारे तुमच्यावर रंग उडवतीलच की. बुरा न मानो होली है, म्हणत ओळखीचे पाळखीचे तुम्हालाही रंगवतील. तुम्ही घरी जाऊन अंघोळ कराल हो, पण तुमच्या स्कूटर कारचे काय?
आजच घरी गेल्या गेल्या या गोष्टी करा, म्हणजे उद्या तुम्हाला त्याचे टेन्शन येणार नाही. कारच्या रंगाचा बेरंग होणार नाही. जाणून घ्या काही टिप्स.
तुम्ही मोकळ्या जागेत किंवा अरुंद गल्लीत तुमची कार पार्क केल्यास, होळीचा जल्लोष करणार्या गर्दीचे तुम्ही सहज शिकार होऊ शकता. त्यामुळे तुम्ही तुमची सुंदर कार सुरक्षित गॅरेजमध्ये पार्क करू शकता किंवा जिथे होळी खेळली जाणार नाही तिथे पार्क करू शकता.
ओपन स्पेस किंवा रस्त्याच्या बाजुला गाडी पार्क करत असाल तर तिला कव्हर घाला. म्हणजे ओले रंग किंवा पाणी त्यावर पडणार नाही.
कारला रंगांच्या प्रभावापासून वाचवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे कारवर वॅक्स पॉलिश लावणे. वॅक्स पॉलिश हट्टी ऑइल पेंट किंवा कायमस्वरूपी पेंट कार पेंटच्या वरच्या थरावर स्थिर होण्यापासून प्रतिबंधित करते. ज्याद्वारे तुमच्या कारचा रंग सुरक्षित राहील.
पण जर तुम्हाला तुमच्या कारमध्ये वॅक्स-पॉलिश मिळत नसेल, तर घाबरण्यासारखे काही नाही. तुम्ही तुमची सुंदर कार वॉटरप्रूफ कव्हरने कव्हर करू शकता. पण त्यात कोणतेही छिद्र किंवा गळती नसावी. जर प्लॅस्टिक कव्हरची शीट पुरेशी जाड असेल तर ते तुमच्या कारला रंगाच्या परिणामांपासून वाचवेल.
पाण्यामुळे कारच्या क्रोम भागांचे नुकसान होते. त्यांचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यावर क्लिंग फिल्म किंवा अॅल्युमिनियम फॉइल ठेवणे. रंगीत पाण्यामुळे कारच्या क्रोम फिनिश केलेल्या दरवाजाचे हँडल आणि समोरील लोखंडी जाळी खराब होऊ शकते.
हे झाले रंगखेळण्या आधीचे. आता तुम्हाला शक्य झालेच नाहीतर रंगलेल्या कारचे पुढे काय करावे हे पहा...तुम्ही अशाप्रकारे कार साफ करू शकता.
कार धुण्यापूर्वी त्यावर पाणी टाका, त्यामुळे रंग थोडा ओला होईल आणि त्यानंतर तो लवकर स्वच्छ होईल. रंग तसाच सुक्या कपड्याने झाडू नका, छोटे छोटे पार्टिकल्स, धुळ असल्याने ओरखडे येण्याची शक्यता असते.
कार धुण्यासाठी, डिटर्जंट किंवा लॉन्ड्री साबणाऐवजी कार शॅम्पू वापरा. कारण डिटर्जंट आणि साबण खूप हार्ड असतात आणि गाडीचा रंग उडण्याची भीती असते. कार धुताना फक्त सुती कापड वापरा. त्यावर कधीही लाँड्री ब्रश किंवा अन्य कोणते कापड वापरू नका.
जर पहिल्याच धुलाईत गाडीवर उडालेला रंग जात नसेल तर त्यापेक्षा जास्त काळजी करण्याची गरज नाही. दोन-तीन वेळा धुतल्याने गाडी आपोआप स्वच्छ होईल.डाग गेल्यानंतर आणि कार सुकल्यानंतर कारवर वॅक्स पॉलिश वापरा. यामुळे कारचा रंग सुरक्षित राहिल.