...तर नव्या कारवर देखील वॉरंटी नाकारतात कंपन्या; या गोष्टींशी छेडछाड करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 01:16 PM2023-04-02T13:16:37+5:302023-04-02T13:22:36+5:30

वॉरंटीसाठी पैसे मोजले तरी देखील तुम्हाला कंपन्या वॉरंटी देत नाहीत. कारण...

जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो तेव्हा अनेकदा लोक लो एंड व्हेरिअंटकडे वळतात. अनेकदा व्हॅल्यू फॉर मनी व्हेरिअंटदेखील घेतात. कंपन्या या कारवर काही वर्षांची वॉरंटी देतात. अनेकदा वॉरंटी वाढवून घ्यावी लागते. वॉरंटीसाठी पैसे मोजले तरी देखील तुम्हाला कंपन्या वॉरंटी देत नाहीत. कारण... तुम्ही त्यांच्या कारसोबत छेडछाड केलेली असते.

वॉरंटी पिरिएडमध्ये तुमच्या गाडीमध्ये काही समस्या आली तर तुम्ही बिनाखर्चात ती दुरुस्ती करून घेऊ शकता. कंपनीच्या डीलरशीपच्या सर्व्हिस सेंटरकडे पार्ट मोफत बदलून मिळतात. परंतू जर तुम्ही काही गड़बड केली असेल तर तुम्हाला ही वॉरंटी दिली जात नाही.

कारची वॉरंटी मिळण्यासाठी कंपन्या काही अटी घालतात, त्या पाळाव्या लागतात. अनेकदा आजाणतेपणी काही तरी करून बसतो आणि कंपनीची वॉरंटी रद्द होते. जर असे झाले तर डीलर मोफत दुरुस्ती करून देत नाही. तसेच कंपनीदेखील ऐकत नाही. यासाठी काय करावे लागेल...

कंपनीद्वारे देण्यात आलेल्या व्हीलमध्ये बदल करू नये. काही लोक कार घेतल्या घेतल्या कारच्या व्हील्समध्ये बदल करतात. भारी दिसणारे अलॉय व्हील्स लावतात. असे केल्यास वॉरंटी व्ह़ॉईड केल्याचे मानले जाते. कंपनीने सांगितलेल्या साईजचे टायर बदलून कमी जास्त साईजचे लावल्यास देखील वॉरंटी संपविली जाते.

कारच्या सनरुफ, सीट, हेडलाईट किंवा टेललाईटमध्ये छोटे-मोठे केलेले बदल देखील कारची वॉरंटी संपविण्यास कारणीभूत असतात. काहीजण प्रखर प्रकाशासाठी कटआऊट वापरतात, काही एलईडी लाईट लावतात. ते चुकीचे आहे.

कारच्या इंजिनासोबत छेडछाड करू नये. काहीजण त्याला बुस्टर किंवा टर्बो चार्जर लावतात. असे केल्याने वॉरंटी संपते. इंजिनमध्ये काही बदल केल्यास देखील त्याचा परिणाम वॉरंटीवर होतो.

कारमध्ये कंपनीने दिलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी केलेली छेडछाड देखील वॉरंटी समाप्त करते. कारमध्ये एक्स्ट्रा डिव्हाईस लावण्यासाठी वायर कट केल्यास वॉरंटी संपते. कारमध्ये एसी, स्पीकर, इंन्फोटेन्मेंट सिस्टिम, लाईट, वायरलेस सिस्टिम आदीमध्ये अनधिकृत बदल करू नयेत.

वॉरंटी पिरिएडमध्ये बाहेर कुठल्याही गॅरेजमध्ये कार सर्व्हिस करू नये. असे केल्यास कंपन्या वॉरंटी देत नाहीत. जर प्रवासादरम्यान कारमध्ये समस्या आली तर तुम्ही आरएसएचा वापर करून यापासून वाचू शकता.

टॅग्स :वाहनAutomobile