Car PDI Must While Purchasing: काय असते पीडीआय? गाडी खरेदी करण्यापूर्वी कशी तपासावी, आपटलेली-धोपटलेली तर नाही ना... By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:22 PM 2023-02-22T14:22:26+5:30 2023-02-22T14:27:28+5:30
आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात. परंतू जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर सर्व स्वप्ने डोळ्यांदेखत उध्वस्त होतात. हे बऱ्याच जणांसोबत घडलेय... आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात. परंतू जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर सर्व स्वप्ने डोळ्यांदेखत उध्वस्त होतात. मग सुरु होतो तो मानसिक त्रास. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांनाच नाही तर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा कार खरेदी करणाऱ्यांना देखील काही गोष्टी माहिती असायला हव्यात.
कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला जी कार दिली जाणार आहे, त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. कार असो की दुचाकी, ती वाहतूक करताना किंवा ट्रकमधून खाली उतरवताना-चढविताना, किंवा डीलरच्या पार्किंगमध्ये लावताना घासते किंवा आदळते. हे सर्व शोरुमकडून मलमपट्टीकरून लपविले जाते.
काहीवेळा आतील पार्ट फॉल्टी असतात. एसी चालत नसतो किंवा अन्य गोष्टी असतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर ती कार तुमच्या गळ्यात मारली जाते. अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. डीलरचे पैसे लागलेले असतात त्याला ती कार कशीही करून ग्राहकाच्या गळ्यात मारायची असते. शोरुममधील कर्मचारी हे काय तुमचे भाऊबंद नसतात, त्यांनाही कमिशनची पडलेली असते. यामुळे फसता तुम्ही...
यातून वाचण्यासाठी तुम्हाला कारचा पीडीआय करणे गरजेचे आहे. शोरूममधून कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी काही गोष्टी तपासायच्या असतात. त्याला प्री-डिलिव्हरी तपासणी म्हणतात.
बहुतेकजण कार खरेदी करतात पण त्यांना याची माहितीच नसते. प्री-डिलिव्हरी तपासणीत वाहन वितरण करण्यापूर्वी सर्व गोष्टी तपासल्या जातात. यामध्ये डीलरने दिलेली आश्वासने देखील पहायची असतात. यावेळी ग्राहकांनी सावध राहून बाह्य, आतील आणि वाहनाचे इतर भाग तपासले पाहिजेत.
कार खरेदी करताना, वाहन बद्दल त्याचे मॉडेल काय आहे, किंमत किती आहे, अॅक्सेसरीज कोणत्या दिल्यात, रोड टॅक्स किती, फायनान्स सुविधेमध्ये कोणते फायदे उपलब्ध असतील, एजंटकडून या सर्व गोष्टींबद्दल माहिती घ्यावी.
टायर, पार्किंग सेन्सर, म्युझिक सिस्टिम, बॅटरी आदी पार्ट नीट काम करत आहेत का, हे तपासावे. एखाद्या पार्टचा नट नाहीय किंवा ढिला लागलाय. विंडशिल्डला क्रॅक गेलेत किंवा लूझ लागलीय, चारही बाजुला हाताने कुठे गंज लागलाय, कुठला पत्रा खालीवर असा लागतोय का किंवा ओबडधोबड दिसतोय का हे देखील तपासावे. यासाठी तिरप्या पडणाऱ्या लाईटचा देखील आधार घ्यावा.
काचेच्या खिडक्या आणि कारच्या दारावर एक बारकोड आहे, ज्यावर काही संख्या लिहिलेल्या असतात. त्या संख्या एकमेकांसारख्या आहेत का ते तपासा. जर असे नसेल तर हे समजून घ्या की कारमध्ये छेडछाड केली गेली आहे.
महत्वाचे म्हणजे कंपनीच्या एकाच कलरमध्ये थोडाफार फरक असतो. जर कार रिपेंट केली असेल तर आधीचा कंपनीने मारलेला कलर आणि नंतर डीलरने मारलेला कलर यात शेडमध्ये फरक असतोच असतो. कारण ते कलर तयार करण्याची वेळ वेगवेगळी असते. यामुळे प्रकाशाचा व त्याच्या दिशेचा योग्य वापर केल्यास हा फरक समजून येतो. तसे दिसल्यास तुमची कार डॅमेज किंवा तो भाग पुन्हा रिपेंट केल्याचे समजावे.
कारची दारे आणि डॅशबोर्डच्या सभोवतालच्या स्क्रूची तपासणी करा. ते लुज असतील किंवा वेडेवाकडे असतील तर छेडछाड झालीय. काहीवेळा दोन स्क्रूची साईजही वेगवेगळी असू शकते. कंपनीतून गाडी येताना या चुका होऊच शकत नाहीत.