गडकरींनी केलेले रस्तेही पुरे पडणार नाहीत! दिवसाला १० हजार कार विकताहेत कंपन्या; भविष्यात तर... By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 01:57 PM 2023-06-29T13:57:17+5:30 2023-06-29T14:04:27+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून कारच्या विक्रीने दर महिन्याला तीन लाखांचा आकडा पार केला आहे. हा सहा महिन्यांचा आकडा मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियासारख्या देशांच्या वर्षाच्या विक्रीएवढा आहे. बीएस ६, कोरोनामुळे मोठ्या आव्हानांमध्ये सापडलेल्या ऑटो उद्योगाने कमालीचा वेग पकडलेला आहे. ऑटो कंपन्या थोड्या थोडक्या नव्हेत तर दिवसाला १० हजार कार विकत आहेत. यंदाच्या पहिल्या सहा महिन्यांत कार विक्रीचा आकडा 20 लाख यूनिट पार करण्याची शक्यता आहे. हे अर्थव्यवस्थेने गती पकडल्याचे संकेत असल्याचे म्हटले जात आहे.
ईटीआयजीने डेटा जाहीर केला आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कारच्या विक्रीने दर महिन्याला तीन लाखांचा आकडा पार केला आहे. हा सहा महिन्यांचा आकडा मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियासारख्या देशांच्या वर्षाच्या विक्रीएवढा आहे. जर विक्रीचा हार वेग दुसऱ्या तिमाहीत कायम राहिला तर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ होणार आहे. आता चीन पहिल्या आणि अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मारुतीचे विक्री व्यवस्थापनचे सीईओ शशांक श्रीवास्तव यांनी जूनपर्यंत कार विक्रीचा आकडा 325,000 ते 328,000 युनिटवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा २.५ टक्क्यांनी अधिक आहे.
जून तिमाहीमध्ये ऑटो इंडस्ट्री एकूण 996,000 कार विक्री करेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीमध्ये हा आकडा 1,017,000 युनिट एवढा होता. या दोन्ही तिमाहीचा आकडा एकत्र केला तर तो २० लाखांच्या आसापास जातो.
भारतीय वाहन बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच हा विक्रम होणार आहे. ही सलग तिसरी तिमाही असेल ज्यामध्ये दोन आकडी वाढ दिसणार आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत १६ टक्के तर दुसऱ्या सहामाहित ३० टक्क्यांची वाढ झाली होती.
२०२३ पर्यंत पॅसेंजर कारच्या विक्रिचा आकडा वर्षाला ६० ते ७० लाख एवढा जाण्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे तर पॅसेंजर कारचे मार्केट येत्या सहामाहीत १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या आपल्या देशात १००० लोकांमागे ३५ कार आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक कोंडीवर त्यांच्या शैलीत भाष्य केले होते. ''दिवसरात्र मेहनत करून लोक संख्या वाढवत आहेत. एका माणसाकडे पाच पाच गाड्या आहेत. मग वाहतूक कोंडीपासून सुटका कशी होईल.'' असे ते म्हणाले होते.
आता ऑटो कंपन्यांची विक्री पाहता आतापर्यंत गडकरी यांनी बनविलेले मोठमोठाले रस्ते देखील अपुरे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.