Diesel Shortage: जगावर डिझेल टंचाईचे प्रचंड मोठे संकट; चाके थांबणार, थंडीने लोक गोठणार... By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 08:49 PM 2022-11-22T20:49:49+5:30 2022-11-22T20:55:46+5:30
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये डिझेलला सर्वाधिक आवश्यक इंधनात गणले जाते. मालवाहतूक करणारी वाहने जसे की ट्रक, बस, जहाजे, ट्रेन आदी सारे यावरच चालतात. तेच मिळण्याचे सारे मार्ग बंद होणार आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये डिझेलला सर्वाधिक आवश्यक इंधनात गणले जाते. मालवाहतूक करणारी वाहने जसे की ट्रक, बस, जहाजे, ट्रेन आदी सारे यावरच चालतात. एवढेच नाही तर बांधकाम, उत्पादन आणि शेतीसाठीची यंत्रे देखील याच इंधनावर चालतात. अमेरिका आणि युरोपमध्ये घरे गरम ठेवण्यासाठी देखील डिझेल मोठ्या प्रमाणावर जाळले जाते. असे असताना डिझेलच्या टंचाईबाबत महत्वाची माहिती हाती येत आहे.
येत्या काही महिन्यांत जगभरात डिझेलच्या उपलब्धतेत मोठी घट होण्याची शक्यता आहे. हे अशावेळी होत आहे, जेव्हा सर्व एनर्जी मार्केट पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त आहेत. महागाईने परिस्थिती बिघडलेली आहे. तसेच विकासही ठप्प झाला आहे. ब्लुमबर्गनुसार डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे लोकांचे जगणे कठीण होणार आहे. अमेरिकेलाच जवळपास १०० अब्ज डॉलरचा फटका बसणार आहे.
अमेरिकेतील डिझेल आणि हिटिंग ऑईलचा साठा गेल्या चार दशकांच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर आहे. युरोपमध्येही हेच हाल आहेत. रशियाने पुरवठा बंद केल्याने युरोपची देखील परिस्थिती बिघडत चालली आहे. जागतिक निर्यात बाजारातील परिस्थिती इतकी वाईट आहे की, पाकिस्तानसारख्या गरीब देशांचा पुरवठा थांबला आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिझेल संकट असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
यूएस स्पॉट मार्केटमध्ये डिझेलच्या किमतीत यावर्षी 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याची किंमत $4.90 प्रति गॅलनवर पोहोचली होती. युरोपमधील डिझेल फ्युचर्सची किंमत ब्रेंटपेक्षा $40 प्रति बॅरल जास्त आहे. डिसेंबर न्यूयॉर्क डिझेल फ्युचर्स जानेवारीच्या तुलनेत 12 सेंट जास्त आहेत. डिझेलच्या कमतरतेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कच्च्या तेलाचा पुरवठा आधीच खूप कमी होत आहे. कच्च्या तेलापासून डिझेल आणि पेट्रोल बनवण्यावर मोठे संकट आले आहे. अनेक रिफायनर्सनी महामारीमुळे मागणीवर परिणाम झाल्यामुळे त्यांचे अनेक प्लांट बंद केले होते. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीवरही परिणाम झाला. 2020 पासून अमेरिकेतच रिफाइनिंग कॅपॅसिटी प्रतिदिन 10 लाख बॅरलपेक्षा कमी झाली आहे. युरोपमधील शिपिंग व्यत्यय आणि कामगार संपामुळे रिफायनरी उत्पादनावर परिणाम झाला आहे.
आज युरोपला जगातील इतर देशांतून डिझेल आयात करावे लागत आहे. याचा फायदा चीन आणि भारतासारख्या देशांना होत आहे. या वर्षाच्या अखेरीस चीनमधून तेलाची निर्यात 1.2 दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. थायलंडने डिझेलवरील कर कमी केला आहे. व्हिएतनाम देखील पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.