Crude Oil Price Hike: कच्चे तेल भडकले! विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरवाढीची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:23 PM 2022-01-27T15:23:41+5:30 2022-01-27T15:31:48+5:30
Crude Oil Price Hike: देशात गेल्या तीन महिन्यांपासून इंधनाच्या किंमती वाढलेल्या नाहीत. दिवाळीला केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले होते. यामुळे सरकारी कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर प्रति बॅरलवर गेले आहेत. २०१४ नंतर अशी पहिलीच वेळ आहे, कच्चे तेल एवढ्या उंचीवर जाऊन पोहोचले आहे. या दरवाढीचा परिणाम भारतामध्ये देखील पहायला मिळण्याची शक्यता आहे. सरकार विधानसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर ग्राहकांना झटका देण्याची शक्यता असून पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.
देशात गेल्या तीन महिन्यांपासून इंधनाच्या किंमती वाढलेल्या नाहीत. दिवाळीला केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले होते. यामुळे सरकारी कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. देशात पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत सरकारी कंपन्यांचा हिस्सा ९० टक्क्यांहून अधिक आहे.
पुरवठा कमी झाला तसेच युरोप आणि मध्य आशियामध्ये युद्धाचे ढग यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमती 90.02 डॉलर वर गेल्या होत्या. हा दर २०१४ नंतरच्या सात वर्षांतील सर्वोच्च दर आहे.
याच महिन्यात येमेनच्या हुती विरोधकांनी अबुधाबीमध्ये तेलाची टाकी बॉम्बने उडविली होती. तेल उत्पादनात अडथळा आणण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिला तर कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडतील. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत प्रति बॅरल $ 125 पर्यंत पोहोचू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे हा तणाव कमी झाल्यास दर खाली येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून मतदारांना नाराज करायची सरकार भूमिका घेणार नाही. यामुळे आणखी महिनाभर दर तसेच राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे गेल्या वर्षी दिवाळीत देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. त्यावेळी कच्चे तेल प्रति बॅरल सुमारे ८० डॉलर होते. तेव्हापासून ते प्रति बॅरल $10 ने वाढले आहे.