इलेक्ट्रीक स्कूटर घ्यावी की पेट्रोल? त्या किंमतीत तुम्ही ५ ते ७ वर्षे पेट्रोल विकत घ्याल, दोन वर्षानंतरही तेच... By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:34 PM 2024-02-20T13:34:47+5:30 2024-02-20T14:01:57+5:30
IS Electric Scooter Affordable than petrol? तुम्हाला रस्त्यावर आता बऱ्यापैकी ईलेक्ट्रीक स्कूटर दिसू लागल्या असतील. कधी या स्कूटरच्या मालकांना त्यांचे दुखणे विचारलेय का? नक्की विचारा... चांगल्यातल्या चांगल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात येऊन आता दोन वर्षे उलटली आहेत. तरीही लोकांच्या मनात इलेक्ट्रीक स्कूटर घेऊ की नको घेऊ अशी घालमेल सुरु आहे. ओला, एथर, टीव्हीएस, हिरोची व्हिडा अशा अनेक कंपन्या आहेत. दोन वर्षांपूर्वी शेकडोनी कंपन्या आलेल्या त्या कुठे गायब झाल्या कळलेच नाही. आता मोजक्याच कंपन्या दिसत आहेत. मग अशावेळी इलेक्ट्रीक स्कूटर घ्यायची की पेट्रोल असा प्रश्न आम्हालाही पडला होता. चला पाहुया...
तुम्हाला रस्त्यावर आता बऱ्यापैकी ईलेक्ट्रीक स्कूटर दिसू लागल्या असतील. कधी या स्कूटरच्या मालकांना त्यांचे दुखणे विचारलेय का? दोन चार मालकांना विचारून पहा, गुगलवरील त्या कंपन्यांच्या स्कूटरचे रिव्ह्यू पहा... अनेक लोक तुम्हाला या स्कूटर घेऊ नका असेच सांगत आहेत. तरीही पायावर धोंडा मारून घ्यायचा विचार करत असाल तर एकदा हे पहा...
मुख्य म्हणजे ईलेक्ट्रीक स्कूटर आजही महाग आहेत. ओलाच्या स्कूटरला सध्या २५ हजार रुपयांचा डिस्काऊंट सुरु आहे. सबसिडी, डिस्काऊंट आदी सारे वगळता एस १ प्रो ही तुम्हाला ऑनरोड पुण्यात १४५२९९ रुपयांना पडतेय. ती लोनवर घेतली तर २४ महिन्यांसाठी डाऊनपेमेंटसह १ लाख ७५ हजार रुपयांना जाते. ३६ महिन्यांसाठी केले तर १ लाख ८८ हजारांना जाते.
एथरचे उदाहरण घेतले तर ४५० एस ऑनरोड १.१३ लाखांना व ४५० एक्स ऑनरोड १ लाख ७८ हजार रुपयांना पडते. याची डाऊनपेमेंट व्याजासह रक्कम २४ महिन्यांसाठी ४५० एस १,६१,६००; 36 महिन्यांसाठी १,७१,५६० रुपयांना पडते. शिवाय गुगल मॅपची पॅकेज वेळोवेळी घ्यावे लागते, याची किंमत ३००० रुपये वगैरे.
एथर ४५० एक्स घेतली तर २४ महिन्यांसाठी २ लाख १७ हजार रुपये व्याजासह आणि ३६ महिन्यांसाठी २ लाख ३३ हजार रुपये... या किंमतीच्या ईएमआयमध्ये तुम्हाला पेट्रोल स्कुटरचा ईएमआय २ वर्षे आणि सात वर्षांचे पेट्रोल येईल... चार्जिंगचा हिशेब तुम्हाला पुढे वाचायला मिळेल....
आता हिशेब घाला... पेट्रोलची स्कूटर ज्युपिटर, अॅक्टिव्हा तुम्हाला ऑनरोड १.२, १.५ लाखाला पडते. कर्जाने घेतली तर व्याजाचे १५ हजार रुपये जातात असे पकडा. इलेक्ट्रीक स्कूटरच्या व्याजासहीतच्या किंमतीची तुलना केली तर वरचे पैसे रिकव्हर करायला तुम्ही तुमच्या स्कूटरमध्ये किमान ५ वर्षांचे तरी पेट्रोल घालू शकाल. एथरची स्कूटर घेतलात तर ती ओलापेक्षाही महाग जाते. शिवाय त्यांची पॅकेज घ्यावी लागतात ती वेगळीच.
सरासरी शहरात घर ते ऑफिस, कामाचे ठिकाण किंवा दिवसाचे रनिंग २०-३० किमी असते. शाळेत मुलांना सोडायला जाणाऱ्यांचे तर त्याहून कमी. मग अशा लोकांना इलेक्ट्रीक स्कूटर परवडेल का? नाही. मग इलेक्ट्रीक स्कूटर परवडण्यासाठी तुमचे कमीत कमी रनिंग हे दिवसाला ५० ते ६० किमी किंवा त्यापेक्षा जास्त हवे. तरच ती तुम्हाला परवडू शकते.
दुसरी विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर का इलेक्ट्रीक स्कूटर बिघडली, चार्जर बिघडला किंवा अन्य काही समस्या आली तर कंपन्या काही केल्या ती स्कूटर तुम्हाला एका आठवड्यापेक्षा कमी काळात परत देत नाहीत. ओला असो, एथर की टीव्हीएस की बजाज. एखादा पार्ट गेला तर या कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पार्ट अव्हेलेबल नसतात अशा तक्रारी आम्ही ग्राहकांकडून ऐकल्या.
तिसरी गोष्ट म्हणजे या सर्व्हिस सेंटरमध्ये ईलेक्ट्रीक स्कूटरचे पूर्ण नॉलेज असलेले कर्मचारी फार कमी असतात. असले तरी त्यांच्याकडे एवढा लोड असतो की ओलाच्या स्कूटर एक-दोन महिने अशाच सर्व्हिस सेंटरमध्ये पडून आहेत. मग त्या ग्राहकाने दैनंदिन वापरासाठी काय करावे? ऑफिसला जाऊच नये का? कामाला जाऊच नये का? की ईलेक्ट्रीक स्कूटरसाठी आणखी एक विश्वासातील पेट्रोल स्कूटर ठेवावी?
चार्जिंग... ईलेक्ट्रीक स्कूटरच्या चार्जिंगची तर गंमतच आहे. एकतर तुम्ही सोसायट्यांमध्ये राहत असाल तर सोसायटीची परमिशन असेल तरच पार्किंगमध्ये चार्जर लावायला मिळतो. नाहीतर द्रविडी प्राणायाम ठरलेले. ज्यांचे बंगले आहेत, त्यांना बाहेर सोय असेल तर ठीक. नाहीतर कंपन्यांच्या चार्जिंग पॉईंटवर तुम्हाला गाड्या चार्ज कराव्या लागतात. तिथे वेटिंग तर असेलच. एका स्कूटर चार्ज व्हायला एक ते दीड तास लागतो. शिवाय एथर एका किमीला एक रुपये चार्ज घेते. अन्य ठिकाणी तुम्हाला युनिटामागे २४ ते २५ रुपये चार्ज केला जातो. आता ती स्कूटर देत असलेली खरी रेंज आणि त्यासाठी लागणारी चार्जिंगची रक्कम याचा मेळ घाला.
तुम्हाला ईलेक्ट्रीक स्कूटर घ्यायची असल्यास तुम्हाला लागत असलेले महिन्याचे पेट्रोल, ईएमआय आणि सर्व्हिस कॉस्ट आदींची हिशेब घाला. त्यानंतर जिथे जिथे फिरताना तुम्हाला हे स्कूटर घेतलेले दिसतील त्यांना विचारा, चौकशी करा. ईलेक्ट्रीक स्कूटरचा ईएमआय, सर्व्हिस कॉस्ट, त्यांनी दिलेल्या वॉरंटीच्या टर्म आणि कंडीशन आदींचा विचार करा, बाहेर चार्जिंग करणे परवडते का?
प्रत्येकाचा अनुभव, विचार हा वेगवेगळा असू शकतो. खरेतर वापरानुसार ईलेक्ट्रीक स्कूटर परवडते की नाही हे ठरते. त्यानंतर सर्व्हिसिंग, चार्जिंग आणि सर्वात मोठा ज्याचे ढोंग घेऊ शकत नाही तो म्हणजे पैसा. या सगळ्याचा विचार करता कमी रनिंग असेल त्याला ईलेक्ट्रीक स्कूटर परवडणारी नाही. ज्याचे जास्त रनिंग असेल त्याला ती परवडू शकते. इलेक्ट्रीक स्कूटर घेणाऱ्या लोकांना पेट्रोल स्कूटर चालवावी असेही वाटत नाही, असेही काहींचे अनुभव आहेत. एकदा निर्णय घेताना वरील गोष्टींचा सारासार विचार करावा. (टीप - एथर, ओला या कंपन्यांकडून कोटेशन, लोन ईएमआय याची माहिती घेतलेली आहे.)