Electric Vehicle: देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:46 PM2022-01-20T15:46:17+5:302022-01-20T15:50:50+5:30

काही दिवसांपूर्वीच ही रेंजर इलेक्ट्रिक बाईक अधिकृतपणे समोर आली होती. कोमाकी कंपनीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल.

इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी 'कोमाकी' या आठवड्यात बाजारात आपली रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर लॉन्च करण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी रेंजर इलेक्ट्रिक बाईक अधिकृतपणे समोर आली होती.

बईकचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या बाइकची काही वैशिष्ट्ये देखील समोर आली होती. कोमाकीची ही रेंजर ई-क्रूझर देशात विक्रीसाठी जाणारी पहिली इलेक्ट्रिक क्रूझर असेल.

या बाईकमध्ये 4kWh चा बॅटरी पॅक असेल, जो भारतातील इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आढळणारा सर्वात मोठा बॅटरीपॅक असल्याचा दावा केला जातोय. या बॅटरीतून त्याच्या 5,000-वॅट मोटरला उर्जा मिळेल.

कंपनीचा दावा आहे की, या इलेक्ट्रिक बाईकची रेंज एका चार्ज सायकलमध्ये 200 किमी पेक्षा जास्त आहे. पण, प्रत्यक्षात रस्त्यावर चालवल्यानंतरच याची रेंज कळू शकेल.

मजबूत असण्यासोबतच या बाईकमध्ये क्रूझ कंट्रोल फीचर, रिपेअर स्विच, रिझर्व्ह स्विच, ब्लूटूथ आणि अॅडव्हान्स ब्रेकिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

या बाईकची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. पण, कंपनी आश्वासन देत आहे की या बॅटरीवर चालणाऱ्या क्रूझरची एकूण किंमत परवडणाऱ्या श्रेणीत ठेवली जाईल.

एका अंदाजानुसार, या बाईकची किंमत 1 लाख ते 1.2 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. सध्या, कोमाकी इतर अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्स देखील ऑफर करते, ज्यांची किंमत एक्स-शोरूम ₹30,000 ते ₹1 लाख दरम्यान आहे.

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचे वर्चस्व आहे. इलेक्ट्रिक मोटरसायकलची संख्या खूपच कमी आहे. पण, आता या इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकलमुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.