Electric Vehicle Rumors: इलेक्ट्रीक गाडी पाण्यात गेल्यावर शॉक लागतो; जाणून घ्या 'या' पाच अफवा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:32 PM 2021-12-21T16:32:34+5:30 2021-12-21T16:42:28+5:30
Electric Vehicle, car, scooter Rumors: इलेक्ट्रीक गाड्यांबाबतचा अफवांचा बाजार आजही गरम आहे. यामुळे अनेकजण या गाड्या खरेदी करण्यास घाबरत आहेत. अशा पाच गोष्टी ज्या खोट्या आणि अफवा आहेत, त्या तुम्हाला आज सांगणार आहोत. देशात हळूहळू इलेक्ट्रीक गाड्यांचे मार्केट बहरू लागले आहे. इलेक्ट्रीक कार किंवा स्कूटर घेतली तर ती चार्ज कशी करायची? लिथिअम आयन बॅटरी आहे पेटली तर काय होईल, खराब झाली तर अवाढव्य खर्च असे अनेक विषय आपण ऐकलेले असतात. यामुळे इलेक्ट्रीक पेक्षा पेट्रोल, डिझेलवरचीच कार, स्कूटर बरी असे म्हणत आजही अनेकजण परवडणाऱ्या इव्हीकडे पाठ फिरवत आहेत.
इलेक्ट्रीक गाड्यांबाबतचा अफवांचा बाजार आजही गरम आहे. यामुळे अनेकजण या गाड्या खरेदी करण्यास घाबरत आहेत. अशा पाच गोष्टी ज्या खोट्या आणि अफवा आहेत, त्या तुम्हाला आज सांगणार आहोत.
पाण्यात गेल्यावर... इलेक्ट्रीक गाड्या पाण्यात गेल्या किंवा त्याच्या संपर्कात आल्या तर शॉक लागतो, असे सांगितले जाते. खरेतर कंपन्या या गाज्या पाण्यातूनही चालविता येतात असा दावा करतात. त्याची जाहिराही करतात. कारण त्यांच्या इंजिनात पाणी जायचा प्रश्न येत नाही. तसेच या गाड्या सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये, वातावरणात चालविण्यासाठी बनविलेल्या असतात.
साध्या सुध्या कंपन्यांचे माहिती नाही, कारत त्यांच्याकडे तेवढे संशोधन, टेस्टिंग घेण्यासाठी पैसे, यंत्रणा नसते. परंतू मोठ्या कंपन्या सर्व प्रकारची भौगोलिक परिस्थितींमध्ये गाड्या चालवून त्या समस्येनुसार बदल करतात आणि गाड्या लाँच करतात. यामुळे या इलेक्ट्रीक गाड्यांमधील बॅटरी मोबाईल फोनच्या बॅटरीसारखी वॉटरप्रूफ बनविली जाते. हे वॉटरप्रूफ रेटिंग IP67 असते.
बॅटरी संपली तर... इलेक्ट्रिक गाड्यांबाबतची दुसरी मोठी अफवा म्हणजे गाडीची बॅटरी संपली तर ती तिथेच सोडून कॅब किंवा रिक्षाने परत यावे लागणार. परंतू इलेक्ट्रीक गाड्यांचे पॉवर मॅनेजमेंट एवढे सक्षम असते की तुम्हाला या गाड्या अचूक रेंज दाखवितात. जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात तर पेट्रोल, डिझेलच्या गाड्या इंधन संपवतात. परंतू इलेक्ट्रीक गाडी थांबली की जास्त वीज वापरत नाही. काही गाड्यांमध्ये अशावेळी बॅटरी चार्ज करण्याची यंत्रणा आहे.
चार्जिंग संपले तर कुठे करायचे.... इलेक्ट्रीक गाड्यांबाबत आणखी एक सतावणारी चिंता म्हणजे चार्जिंग आणि रेंज. कंपन्या जो दावा करतात तेवढी रेंज प्रत्यक्षात मिळत नाही. तसेच पुरेशी चार्जिंग स्टेशनही नाहीत. सध्याच्या काळात बाजारात असलेल्या कार या 250 ते 300 किमीची खरी रेंज देतात.
साधारणपणे एक व्यक्ती दिवसाला 150 ते 200 किमीच गाडी चालवितो. फक्त दुरच्या प्रवासाला हे किमी वाढतात. यावेळी चालक थोडी विश्रांती घेतात. या काळात गाडी चार्ज करता येते. 50 किलो वॅटच्या पब्लिक चार्जरवर एका तासात कार 80 टक्के चार्ज होते. स्कूटरचेही तसेच आहे.
इलेक्ट्रिक गाड्यांचा पिकअप किंवा ताकद कमी असते असे सांगितले जाते. परंतू टेस्लाची इलेक्ट्रीक कार 3 सेकंदांत 100 किमीचा वेग पकडते. टाटाची सर्वाधिक खपाची नेक्सॉन ईव्ही देखील 10 सेकंदांत 100 किमीचा वेग पकडते.
मेन्टेनन्स महागडा.... इलेक्ट्रीक गाड्यांबाबत आणखी एक मोठे असत्य ते म्हणजे महागडे आणि मेन्टेनन्स कॉस्ट जास्त येते. टाटा नेक्सॉनच्या ईव्हीची किंमत 14.24 लाख रुपयांपासून सुरु होते. ही एका सामान्य एसयुव्ही एवढीच आहे. नेक्सॉनचे टॉप मॉडेलही त्यापेक्षा जास्त किंमतीचे आहे.
इलेक्ट्रीक गाडी १ किमी जाण्यासाठी 50 पैसे ते 1 रुपयाचा खर्च येतो. तर पेट्रोलची गाडी चालविण्यासाठी 10 ते 15 रुपये, डिझेलची गाडी चालविण्यासाठी 8-10 रुपयांचा खर्च येत आहे.
इलेक्ट्रीक गाडीचे एकच दुखणे आहे, वॉरंटी संपली आणि जर बॅटरी खराब झाली तर तुम्हाला मोठा भूर्दंड बसणार आहे. टाटा आपल्या बॅटरीवर 7 वर्षांची वॉरंटी देते. तर दुचाकी कंपन्या दोन-तीन वर्षांची वॉरंटी देतात. ओकिनावा कंपनीच्या स्कूटरची बॅटरी 45000 रुपयांना येते.