जागा ठरली! अखेर 'टेस्ला'चं भारतातील पहिलं शोरूम मुंबईत; महिन्याचं भाडे पाहून चक्कर येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 13:31 IST2025-03-02T13:14:34+5:302025-03-02T13:31:55+5:30

जगातील सर्वात जास्त श्रीमंतांपैकी एक एलन मस्क यांची कंपनी टेस्ला लवकरच भारतात त्यांचं पहिले पाऊल ठेवत आहे. अलीकडेच टेस्लाने त्यांच्या भारतातील शोरूम आणि फॅक्टरीसाठी भरती सुरू केली होती. त्यामुळे पुढील काळात टेस्ला कंपनीची वाहने देशातील रस्त्यावर धावताना दिसतील.

मस्क याच्या टेस्ला कंपनीने भारतात नवीन शोरूम उघडण्यासाठी जागा फायनल केली आहे. सुरुवातीला अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला भारतातील २ बड्या शहरात त्यांचे शोरूम ओपन करणार आहे. त्यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश आहे.

टेस्ला यांच्या मुंबईतील शोरूमसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मेकर मॅक्सिटी ही जागा निवडण्यात आली आहे. मेकर मॅक्सिटी इथं उघडल्या जाणाऱ्या टेस्लाच्या या शोरूमसाठी ४ हजार वर्ग फूट जागा भाड्याने घेण्यात येणार आहे. मेकर मॅक्सिटीच्या कमर्शियल टॉवरच्या ग्राऊंड फ्लोअरला टेस्ला शोरूम असेल.

टेस्ला कंपनीच्या शोरूमचे मासिक भाडे जवळपास ३५ लाख इतके असेल. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे देशातील सर्वात महागडे कमर्शियल रिअल इस्टेट हब आहे. त्यात टेस्ला कंपनीचे हे शोरूम ऑटो इंडस्ट्रीतील आतापर्यंतचे सर्वात महाग शोरूम असणार आहे.

राजधानी दिल्लीत टेस्ला शोरूम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ब्रुकफिल्ड प्रॉपर्टीज येथील एयरोसिटी परिसरात उघडलं आहे. हे शोरूम जवळपास ४ हजार वर्ग फूट असून त्या शोरूमचे मासिक भाडे २५ लाख इतके असेल.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते, तिथे त्यांची एलन मस्क यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर टेस्लाने भारतात नोकरीसाठी जाहिरात काढली. आता या कंपनीने २ मोठ्या शहरात शोरूमसाठी जागा घेतली आहे. त्यामुळे लवकरच टेस्ला कंपनीची वाहने भारतात विक्रीला येण्याची शक्यता आहे.

काही रिपोर्टनुसार, एप्रिल महिन्यात टेस्ला कंपनी भारतात सुरू होईल. सध्या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग युनिट लावले नाही. कारचं उत्पादन बर्लिन ब्राडेंगबर्ग इथल्या फॅक्टरीत होईल त्यानंतर भारतातील शोरूममध्ये या विक्रीस येतील. कंपनीचा भारतात स्वस्तात इलेक्ट्रिक कार विकण्याचा मानस आहे

लवकरच टेस्ला कंपनीची वाहने भारतीय रस्त्यांवर धावताना पाहायला मिळेल. मात्र, टेस्ला भारतात येण्याच्या धास्तीने ऑटो क्षेत्रात खळबळ उडाली आहे. टेस्लासारख्या जागतिक कंपन्यांच्या भारतात प्रवेशाच्या तयारीने अनेक ऑटो कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

टेस्ला कंपनीने भारतात लॉन्चिंगसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती दिली. भारताने टेस्लाला देशातच प्रकल्प उभारण्याची ताकीद दिली होती. टेस्लाला चीनमधून कार भारतात विकायच्या होत्या. परंतु, गेल्या काही वर्षांपासून टेस्लाने खूप प्रयत्न करूनही ते शक्य झाले नव्हते.

महाराष्ट्रात मोठी ऑटो इंडस्ट्री आहे. पिंपरी चिंचवड आणि चाकण परिसरात ही ऑटो इंडस्ट्री पसरलेली आहे. टेस्लाला हवे असलेले पार्ट्स या भागातून बनवून मिळण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे टेस्ला भविष्यात कार उत्पादनासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचीही शक्यता आहे.