भारतीय लष्करात सामील होणार ही दमदार SUV; आर्मीने दिली 2,978 गाड्यांची ऑर्डर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:04 IST2025-03-28T18:57:30+5:302025-03-28T19:04:55+5:30

पॉवरच्या बाबतीत Thar ला मागे पाडणारी ही SUV भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होणार आहे.

भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांची Thar एक दमदार ऑफ-रोडर SUV म्हणून नावारुपाला आली आहे. मात्र, भारतात एक अशी SUV आहे, जी Thar लाही टक्कर देते. या गाडीबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराच्या ताफ्यात या एसयूव्हीचा समावेश होणार आहे.

आम्ही ज्या SUV बद्दल बोलत आहोत, तिचे नाव फोर्स गुरखा आहे. ही पूर्णपणे भारतीय एसयूव्ही असून, पॉवरच्या बाबतीत Thar पेक्षा दमदार आहे. फोर्स मोटर्सने सांगितले की, त्यांना भारतीय लष्कराकडून 2,978 गुरखा SUV ची ऑर्डर मिळाली आहे.

या सर्व SUV भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, फोर्स मोटर्स आपल्या गुरखा एलएसव्ही (लाइट स्ट्राइक व्हेईकल) च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून संरक्षण क्षेत्रात सेवा देत आहे.

आता लष्कराच्या ताफ्यात गुरखाही सामील होणार आहे. या SUV ला खास ऑफ रोड वापरावर भर देऊन डिझाइन केले आहे. यात हाय ग्राउंड क्लिअरन्स, वेडिंग क्षमता आणि ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी शक्तिशाली 4×4 पॉवरट्रेन आहे. ही एसयूव्ही वाळवंटापासून ते पर्वतापर्यंत कोणत्याही परिस्थितीत धावू शकते.

फोर्स गुरखा दोन बॉडी फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. पहिले 3 डोअर आणि दुसरे 5 डोअर मॉडेल. दोन्ही मॉडेल्समध्ये 2.6-लिटर टर्बोचार्ज्ड इंटर-कूल्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 138 bhp ची कमाल पॉवर आणि 320 nm चा पीक टॉर्क निर्माण करते.

दोन्ही मॉडेल्समध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4×4 क्षमता आहे. उत्कृष्ट ऑफ-रोडिंगसाठी यात पुढील आणि मागील लॉकिंग क्षमता आहेत. आकार आणि पॉवरच्या बाबतीत ही एसयूव्ही थारपेक्षा दमदार आहे.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, फोर्स गुरखाला 18-इंच अलॉय व्हील्स, 7-इंचाचा एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि नवीन 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. हे या नवीन मॉडेलला शक्तिशाली तसेच आरामदायक बनवते.

2024 च्या अपडेटसह 4WD शिफ्टर मॅन्युअल लीव्हर आणि समोरच्या सीट दरम्यान शिफ्ट-ऑन-फ्लाय रोटर नॉबने बदलले गेले आहेत. याच्या 5-डोर मॉडेलची किंमत 18 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपासून सुरू होते. एसयूव्हीला 9.5 किमीचे मायलेज मिळते.