Tata Nexon EV विसरा, 450Km रेंजसह लॉन्च होतीये CRETA EV; पाहा किंमत अन् फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 02:52 PM2023-02-20T14:52:41+5:302023-02-20T14:57:01+5:30

लवकरच Hyundai च्या Creta SUV चे Electric व्हर्जन लॉन्च होणार आहे.

Hyundai Creta Electric : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना प्रचंड मागणी येत आहे. सध्या देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) चे चारचाकी इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये वर्चस्व आहे. परंतु आता लवकरच टाटाला तगडे आव्हान मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai ने त्यांची लोकप्रिय SUV Hyundai Creta च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची चाचणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल (BEV) उत्पादन पोर्टफोलिओवर ,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आधीच घोषणा केली होती.

कंपनीने अलीकडेच खुलासा केला आहे की, ते 6 नवीन इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या लॉन्च करणार आहेत. काही दिवसांपूर्वी Hyundai ने Ioniq 5 इलेक्ट्रिक SUV लाँच केली होती आणि कंपनी Creta Electric SUV लाँच करण्याचा विचार करत आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीला (SU2i EV) सांकेतिक नाव देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पहिल्यांदाच भारतात चाचणीदरम्यान दिसली आहे.

Creta Electric SUV कशी असेल? या इलेक्ट्रिक एसयूव्हीबाबत आत्ताच काही सांगणे कठीण आहे. कारण आतापर्यंत ब्रँडने याबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. परंतु तज्ञांचा असा विश्वास आहे की, यामध्ये कंपनी आपल्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक SUV Kona च्या धर्तीवर 39.2kWh क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर वापरू शकते, जी एका चार्जमध्ये 452 किलोमीटरपर्यंत रेंज देते. या SUV मध्ये कंपनी Kona ची इलेक्ट्रिक मोटर देखील वापरू शकते, जी 136bhp पॉवर आणि 395Nm टॉर्क जनरेट करते.

स्पॉट केलेले चाचणी मॉडेल राखाडी रंगाचे आहे आणि त्याचा फ्लोअर पॅन वाढविला गेला आहे. त्याशिवाय, त्याचे ICE इंजिन क्रेटासारखेच आहे. या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन सध्याच्या मॉडेलवर आधारित असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, क्रेटाच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलचीही प्रतीक्षा आहे जी जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाली आहे.

Hyundai Creta Electric सध्या त्याच्या सुरुवातीच्या चाचणी टप्प्यात आहे. कंपनी 2025 ऑटो एक्सपोमध्ये या गाडीला प्रदर्शित करेल. पुढील वर्षी 2024 च्या अखेरीस त्याचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. लॉन्च केल्यावर Creta EV थेट मारुती सुझुकी YY8 EV ला टक्कर देईल. तसेच ती महिंद्रा आणि टाटा यांच्या आगामी एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

किंमत काय असू शकते? किंमतीबद्दल काहीही सांगणे खूप घाईचे आहे, परंतु असे मानले जाते की ही कंपनीने ऑफर केलेली एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार असेल आणि कंपनी तिची किंमत कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करेल. ही 15 ते 18 लाख रुपयांच्या किमतीत दिली जाण्याची शक्यता आहे.

Hyundai च्या सध्याच्या इलेक्ट्रिक वाहन लाइनअपबद्दल बोलायचे झाल्यास, iOniq 5 ची सुरुवातीची किंमत 44.95 लाख रुपये आणि Kona ची किंमत 23.84 लाख रुपयांपासून सुरू होते. सध्या Tata Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे ज्याची किंमत रु. 14.49 लाखांपासून सुरू आहे.