473KM ची रेंज अन् 58 मिनिटांत फुल चार्ज; Hyundai ने लॉन्च केली क्रेटा EV, किंमत किती..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:37 IST2025-01-17T17:21:17+5:302025-01-17T17:37:26+5:30
Hyundai Creta Electric SUV: दिल्लीच्या भारत मंडपम येथे सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्यात आली.

Hyundai Creta Electric SUV: दक्षिण कोरियातील आघाडीची कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Hyundai ने दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अधिकृतपणे आपली नवीन इलेक्ट्रिक SUV Hyundai Creta EV लॉन्च केली आहे. दिल्लीच्या प्रगती मैदान (भारत मंडपम) येथे सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही SUV जगासमोर सादर करण्यात आली. या EV SUV ची किंमत 17.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
लूक आणि डिझाइन: डिझाइनच्या बाबतीत Hyundai Creta Electric ही पूर्वीच्या (पेट्रोल-डिझेल) मॉडेलसारखीच आहे. बहुतांश बॉडी पॅनल्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यात फक्त नवीन सॉफ्ट प्लास्टिकचा भाग जोडण्यात आला आहे. नवीन पार्ट्सबद्दल सांगायचे तर, यात नवीन स्टाईलचे पुढील आणि मागील बंपर मिळतील. याशिवाय, इलेक्ट्रिक कार्ससारखे झाकलेले फ्रंट ग्रिल आहेत. तसेच, यात नवीन एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्सचा समावेश करण्यात आला आहे. चार्जिंग पोर्टही समोरच मिळेल.
कारच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास, क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये ड्युअल 10.25-इंच स्क्रीन सेटअप आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोना इलेक्ट्रिकपासून प्रेरित असलेले स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. याला नवीन फ्लोटिंग सेंटर कन्सोल डिझाइन मिळते. इतर फिचर्समध्ये पॅनोरामिक सनरूफ, वेहिकल टू लोड (V2L) तंत्रज्ञान, 360-डिग्री कॅमेरा, ADAS सूट मिळेल.
क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये लिथियम मेटल बेस्ड कंपोझिट (LMC) बॅटरी पॅक मिळेल. ही बॅटरी फ्लोअर बोर्डमध्ये बसवली आहे. याला बसवण्यासाठी एसयूवीच्या सस्पेंशनमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळेच क्रेटा ICE व्हर्जनच्या तुलनेत इलेक्ट्रिक क्रेटाचा ग्राउंड क्लीअरेन्स 10 मिमी आणि कारची उंची 20 मिमी वाढली आहे. इतर कंपन्या लिथियम आयरन फॉस्फेट (LFP) बॅटरीचा वापर करतात, तर ह्युंडायने LMC बॅटरी वापरली आहे.
क्रेटा इलेक्ट्रिक दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये येत आहे. ज्यामध्ये 42kWh आणि 51.4kWh बॅटरीचा समावेश आहे. हे दोन्ही बॅटरी पॅक अनुक्रमे 390 किमी आणि 473 किमीच्या रेंजसह येतात. Hyundai चा दावा आहे की, क्रेटा इलेक्ट्रिक (लाँग रेंज) 7.9 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड आहेत. यात स्टीयरिंग कॉलम-माउंटेड ड्राइव्ह मोड सिलेक्टर आहे, जो Ioniq 5 सारखा आहे.
Hyundai दावा करते की, क्रेटा इलेक्ट्रिक फक्त 58 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकते (DC चार्जिंग), तर 11 kW AC वॉल बॉक्स चार्जरद्वारे 4 तासांत 10 टक्के ते 100 टक्के चार्ज होऊ शकते.
क्रेटा इलेक्ट्रिक 4 प्रकारांमध्ये एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सलन्स उपलब्ध असेल. ही SUV 8 मोनोटोन आणि 2 ड्युअल-टोन कलर पर्यायांसह ऑफर केली जात आहे. ज्यामध्ये 3 मॅट रंगांचाही समावेश आहे.
कंपनी बऱ्याच दिवसांपासून Hyundai Creta Electric वर काम करत होती. बाजारात या नवीन EV ची मारुतीच्या आगामी e Vitara, Mahindra BE 6, Tata Curve EV सारख्या कारशी थेट स्पर्धा असेल.