बाईक मायलेज देत नाही? 'या' सोप्या पद्धती फॉलो करा आणि पेट्रोलची मोठी बचत करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:12 PM2021-12-19T13:12:16+5:302021-12-19T13:23:08+5:30

पेट्रोलचे दर कमी होणार नाही, पण तुम्ही काही सोप्या पद्धती वापरुन बाइकचे मायलेज वाढवू शकता. या 6 सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. येणाऱ्या काळातही इंधनाचे दरामध्ये फार फरक पडणर, असे वाटत नाही. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम होत आहे.

भारतात सध्या अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत, पण चार्जिंगची योग्य व्यवस्था आणि वाहनांच्या किमतीमुळे अद्यापही अनेकजण इलेक्ट्रीक वाहनांकडे वळलेली नाहीत. अशा परिस्थितीत लोक फक्त पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींवर अवलंबून आहेत.

अशात तुमची दुचाकी चांगली मायलेज देत नसेल, तर काही सोप्या युक्त्या करुन मायलेज वाढवू शकता. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करुन तुम्ही तुमच्या बाइकचे मायलेज वाढवू शकता.

1.तुमच्या बाईकची वेळोवेळी सर्व्हिस केल्याने तिच्या मायलेजमध्ये मोठा फरक पडतो. बाईक चांगल्या स्थितीत ठेवली तर ती चांगली मायलेजही देईल. त्याचे इंजिन आणि गिअरबॉक्सला लुब्रिकेशनची आवश्यक आहे आणि ते सर्व्हिसिंग करुन योग्य प्रमाणात मिळत राहते. यामुळे तुमच्या बाइकला एक लिटर पेट्रोलमध्ये सामान्यपेक्षा जास्त मायलेज मिळते.

2.याशिवाय, गाडीच्या टायरचे प्रेशरही योग्य असावे लागते. कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु टायरचा बाइकच्या मायलेजवर मोठा प्रभाव पडतो. टायरचा दाब व्यवस्थित ठेवला तर बाइकला चालवायला जास्त जोर लागत नाही आणि इंजिनवर भार पडत नाही. अशा स्थितीत टायरचे प्रेशर योग्य राहिल्यास तुमच्या बाइकचे मायलेज नक्कीच वाढेल.

3.एक सोपा उपाय म्हणजे, सिग्नलवर दुचाकी बंद करा. सिग्नलवर बाईक बंद करून पेट्रोलची थोड्याफार प्रमाणात बचत होऊ शकते. त्यामुळे जर 15 सेकंदांपेक्षा जास्त लाल दिवा दिसत असेल, तर तुमची बाईक बंद करा. तुम्हाला एक महिन्याच्या आत मायलेज वाढल्याचे दिसून येईल.

4.क्लचचा योग्य वापर करून आणि गरज असेल तेव्हाच क्लच वापरुन मायलेज वाढवता येते. जर तुम्ही विनाकारण क्लच पुन्हा पुन्हा दाबत राहिलात तर साहजिकच बाईकचे मायलेज कमी होईल. त्यामुळे चांगले मायलेज मिळवण्यासाठी तुम्ही गरजेनुसारच क्लचचा वापर करावा.

5.योग्य गतीने योग्य गिअरमध्ये बाईक चालवत राहिल्यास इंजिनवर फारसा ताण पडणार नाही. याशिवाय, बाईकला योग्य गिअर पोझिशनमध्ये ठेवल्यास बाईक समान गतीने ठेवल्याने मायलेज वाढते. त्यामुळेच गाडीची गती आणि गरजेनुसारच गिअरमध्ये बदल करा. गिअरचाही मायलेजमध्ये मोठा परिणाम पडतो.

6.तुम्ही कुठेही जाण्यासाठी GPS वापरत असाल, तर Google तुम्हाला योग्य आणि छोट्या मार्गावर घेऊन जाईल. अशावेळी बाईकचे मायलेज साहजिकच वाढते. याशिवाय, ट्रॅफिक अलर्टसह तुम्हाला पुढे जामची माहिती मिळते आणि नकाशावर मार्ग बदलून तुम्ही रहदारी टाळून पेट्रोलची बचत करू शकता.