Indian Car Market: विदेशी कार कंपन्यांचे धाबे दणाणले! भारतात विक्री थंडावू लागली; मारुतीनंतर आता टाटा, महिंद्राचाही जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:35 PM2022-09-20T18:35:58+5:302022-09-20T18:46:58+5:30

मारुती सुझुकी अजूनही भारतीय कार बाजारपेठेतील आपल्या स्थानाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु सध्या त्यांचा बाजारातील हिस्सा कमी होत चालला आहे.

भारतीय कार बाजाराचे (Indian Car Market) चित्र झपाट्याने बदलत आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्रोत्साहन देत आहे तर दुसरीकडे ग्राहकांची पसंतीही बदलत आहे. छोट्या कारला प्राधान्य देणारे भारतीय ग्राहक आता एसयुव्हीच्या खरेदीकडे वळत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम भारतीय कार बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या भारतीय कार कंपन्यांना याचा फायदा होत असताना, परदेशी कंपन्यांचा बाजारातील हिस्सा सातत्याने कमी होत आहे.भारतीय कार बाजारपेठेतील शेअरच्या बाबतीत मारुती सुझुकी अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु अलीकडच्या काळात या कंपनीचा मार्केट शेअर झपाट्याने कमी झाला आहे.

या कंपनीने एकेकाळी भारतीय कार बाजारावर राज्य केले आणि मागणीच्या अर्ध्याहून अधिक गाड्या एकट्यानेच विकल्या. त्याच वेळी, आता परिस्थिती अशी आहे की मारुती सुझुकीचा बाजारातील हिस्सा 40 टक्क्यांहून कमी झाला आहे. गेल्या तीन वर्षांत भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीचा हिस्सा 8 टक्क्यांनी घसरला आहे.

भारतीय कार बाजारात येणाऱ्या या बदलाचा सर्वाधिक फायदा टाटा मोटर्सला झाला आहे. एसयुव्हीची वाढती मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने नेक्सॉन, हॅरियर आणि पंच सारखी मॉडेल्स लाँच केली. भारतीय ग्राहकांना नेक्सॉनला खूप पसंती दिली. तिचे इलेक्ट्रिक मॉडेल Nexon EV ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रीक कार आहे.

दुसरीकडे, कमी बजेटमध्ये एसयुव्हीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांकडून टाटा मोटर्सच्या पंचाला पसंती मिळत आहे. टाटा मोटर्सने सुरक्षेच्या बाबतीतही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. सेफ्टी रेटिंगबाबत उदासीन असलेल्या भारतीय बाजारपेठेत टाटाने एकापाठोपाठ एक फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या कार लाँच केल्या.

ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे पाहिल्यास, मारुती सुझुकीने 1,34,166 कारची विक्री करून प्रथम क्रमांक पटकावला. हे एका वर्षापूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2021 च्या विक्रीपेक्षा 30 टक्के अधिक आहे. त्यापाठोपाठ Hyundai ने ऑगस्ट 2022 मध्ये 49,510 कार विकल्या. Hyundai ची विक्री एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 5.6 टक्क्यांनी वाढली आहे.

दुसरीकडे, जर आपण टाटा आणि महिंद्राकडे पाहिले तर वाढीचा आकडा जबरदस्त आहे. टाटा मोटर्सने ऑगस्टमध्ये 47,166 कार विकल्या. ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या 28,018 युनिटच्या विक्रीच्या तुलनेत ही वाढ 68 टक्के आहे. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रवासी वाहन विभागातील विक्री या कालावधीत 87 टक्क्यांनी वाढून 29,852 युनिट्सवर गेली आहे.

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या देशांतर्गत कंपन्यांना यश मिळालं आहे. मारुती सुझुकीने 2019-20 पर्यंत बाजारपेठेचा 50 टक्के भाग व्यापला होता, परंतु आता त्याचा बाजार हिस्सा 40 टक्क्यांच्या खाली आला आहे. याचे मोठे कारण म्हणजे SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा वाटा फारच कमी आहे.

यासोबतच डिझेल कारचे उत्पादन बंद केल्याने मारुती सुझुकीचा बाजारातील हिस्साही कमी झाला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या या यशामुळे ह्युंदाई आणि मारुती सुझुकी व्यतिरिक्त टोयोटा, होंडा आणि फोक्सवॅगन सारख्या इतर परदेशी कार कंपन्यांसमोरही खडतर आव्हान आहे.