इलॉन मस्क 'या' पुणेकराचे फॅन; कारसाठी दिलं तंत्रज्ञान; सध्या TCS मध्ये करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 02:01 PM2022-03-17T14:01:15+5:302022-03-17T14:05:27+5:30

उद्योगपती इलॉन मस्क पुण्यातील २३ वर्षीय तरुणाचे जबरा फॅन; प्रत्येक प्रश्नाला देतात उत्तर

पुण्यातल्या २३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयर प्रणय पाथोळेच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या गेल्या काही वर्षांत कित्येक पटींनी वाढली आहे. कारण टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क त्याचे फॅन आहेत.

प्रणय पाथोळेनं ४ वर्षांपूर्वी कारच्या ऑटोमॅटिक विंडस्क्रीन वायपरबद्दल एक ट्विट केलं. त्याच्या ट्विटला मस्क यांनी उत्तर दिलं. तेव्हापासून पाथोळे मस्क यांच्याशी डीएमवरून (डायरेक्ट मेसेज) संपर्कात आहेत.

मस्क यांनी पहिल्यांदा पाथोळे यांच्या ट्विटला उत्तर दिलं, त्यावेळी तो इंजिनीयरिंगचा विद्यार्थी होता. सध्या प्रणय टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कार्यरत आहे. आता प्रणयला मस्क यांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे.

'माझ्यावर मस्क यांचा खूप प्रभाव आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी मी ट्विट करायचो. त्यात मल्क यांना टॅग करायचो. पाण्याचे थेंब पडत असल्याचं लक्षात येताच ऑटोमेटिक सुरू होणाऱ्या ऑटोमॅटिक वायपर सेन्सरबद्दलचं एक ट्विट मी २०१८ मध्ये केलं होतं. काही दिवसांत मस्क यांचं उत्तर आलं. त्यांची कंपनी तयार करत असलेल्या कारमध्ये नवं सेन्सर वापरण्यात येणार असल्याचं मस्क यांनी मला कळवलं,' अशी आठवण प्रणयनं सांगितली.

मस्क यांची मालकी असलेल्या स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिप रॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेप्टर इंजिनबद्दल प्रणयनं डिसेंबर २०२० मध्ये एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला मस्क यांनी डीएम करून उत्तर दिलं.

यानंतर मस्क यांच्यासोबत डीएममधून संवाद सुरू झाला. तंत्रज्ञानाशी संबंधित रंजक गोष्टी मी ट्विट करायचो. त्याला मस्क उत्तर द्यायचे. बहुधा त्यांना माझी ट्विट्स आवडत असावीत. माझ्या बऱ्याचशा ट्विट्सना त्यांनी उत्तरं दिली, असं प्रणयनं सांगितलं.

मस्क यांनी प्रणयच्या ट्विट्सला उत्तरं देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ट्विटरवर प्रणय यांचे फॉलोअर्स वाढू लागले. आता प्रणय यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखाहून अधिक आहे.

प्रणय मस्क यांना स्पेसएक्स आणि स्टारशिप रॉकेट आणि त्याच्या सामर्थ्यशाली इंजिनाबद्दल प्रश्न विचारतो. प्रणयनं विचारलेल्या बहुतेक प्रश्नांना मस्क उत्तरं देतात.

सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी मी मस्क यांना प्रश्न विचारत नाही. मी त्यांना आदर्श मानतो. ते मनानं खूप चांगले आहेत असं मला वाटतं, असं प्रणय म्हणाला.

मस्क यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत करतात. त्यांच्यासोबत काम करणं हे माझं स्वप्न आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचं आहे. एकाचवेळी अनेक गोष्टी तितक्याच समर्पण भावनेनं करण्याची त्यांची क्षमता अविश्वसनीय असल्याचं म्हणत प्रणयनं मस्क यांचं तोंडभरून कौतुक केलं.