भारतीयांच्या पसंतीची ७ सीटर कार मारुती अर्टिगाची क्रॅश टेस्ट झाली; किती स्टार रेटिंग मिळाली? By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:14 PM 2024-08-01T13:14:26+5:30 2024-08-01T13:22:13+5:30
पाच वर्षांपूर्वी ग्लोबल एनकॅपच्या सीईओने भारतात येऊन मारुतीला सुरक्षित कार बनविण्याचे चॅलेंज दिले होते. ते मारुती सुझुकीला आजपर्यंत काही पूर्ण करता आलेले नाही. मारुतीच्या अनेक कार तर झिरो स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत.
आता देशातील सर्वाधिक पसंतीची असलेली सात सीटर एमपीव्ही कार मारुती अर्टिगा कंपनीने GNCAP मध्ये क्रॅश टेस्टसाठी पाठविली होती. तिचा रिझल्ट आला आहे.
मारुती अर्टिगाचा रिझल्ट काही चकीत करणारा नाहीय. कारण नेहमीप्रमाणे मारुतीच्या या कारने देखील खराब प्रदर्शन केले आहे. फक्त जमेची बाब एवढीच की झिरो ऐवजी तिने एक स्टार आणला आहे. टेस्टला पाठविण्यात आलेली मारुतीची ही कार भारतात बनविण्यात आलेली असून साऊथ आफ्रिकेत विक्री केली जाते.
मारुतीच्या या एमपीव्हीला प्रौढांच्या सुरक्षेत १ स्टार मिळाला आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी दोन स्टार मिळाले आहेत. प्रौढांसाठी 34 पैकी 23.63 गुण मिळाले आहेत. मुलांसाठी 49 पैकी 19.40 गुण मिळाले आहेत.
मारुती अर्टिगाने फ्रंटल ऑफसेट चाचणीमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशासाठी डोक्याचे संरक्षण बऱ्यापैकी केल्याचे GNCAP अहवालाचे म्हणणे आहे. पण ड्रायव्हरच्या छातीवरचे संरक्षण फारच कमी झाले होते.
साइड मूव्हेबल बॅरियर टेस्टमध्ये ड्रायव्हरच्या डोक्याला चांगले संरक्षण आणि छातीसाठी पुरेसे संरक्षण होते. चाचण्यांनुसार, फ्रंटल बॉडीशेल अस्थिर होती, असा रिमार्क देण्यात आला आहे.
या कारमध्ये वाहनात ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी फ्रंटल एअरबॅग्ज होत्या. मुलांसाठी ISOFIX सुरक्षा वैशिष्ट्यांसह सीट बेल्ट रिमाइंडर, ESC सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश होता.
अर्टिगाने ड्रायव्हर आणि प्रवाशाच्या डोक्याला संरक्षण दिले आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी २ स्टार मिळाले हीच काय ती जमेची बाजू ठरली आहे.