सनरुफच्या नावे तुम्हाला मुनरुफ देत फसविले तर जात नाहीय ना? कंपन्या तुम्हाला कार विकतायत खऱ्या, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:49 IST2025-02-11T13:41:08+5:302025-02-11T13:49:06+5:30

moonroof vs sunroof: अनेकांना सनरुफ आणि मूनरुफ एकच असल्याचे वाटते. परंतू प्रत्यक्षात ही दोन वेगवेगळी फिचर्स आहेत. मग यातील फरक कसा ओळखायचा, चला आपण दोन्ही गोष्टींतील फरक पाहुयात...

सध्या भारतीय बाजारात सनरुफ नावाच्या फिचरची मोठी चलती आहे. लहान मुले त्यांच्या पालकांकडे सनरुफ असलेल्या कार घेण्याची मागणी करत आहेत. कंपन्यांनी देखील हे हेरले आहे. खरेतर भारतात याचा वापर फार कमी आहे, परंतू तरीही कंपन्यांसाठी पैसा कमविण्याचा आणि कार सेल करण्याचा फॉर्म्युलाच तयार झाला आहे. आता कंपन्या जरी तो सनरुफ म्हणून विकत असल्या तरी मुनरुफ तुमच्या गळ्यात पडू शकतो, तुम्ही या दोन गोष्टींमध्ये फरक करण्यात फसत तर नाही आहात ना...

अनेकांना सनरुफ आणि मूनरुफ एकच असल्याचे वाटते. परंतू प्रत्यक्षात ही दोन वेगवेगळी फिचर्स आहेत. मग यातील फरक कसा ओळखायचा, चला आपण दोन्ही गोष्टींतील फरक पाहुयात...

सनरूफ म्हणजे कारच्या छतावर बसवलेले स्लाइडिंग किंवा पॅनेल उघडण्याचे वैशिष्ट्य. ते धातू किंवा काचेचे बनलेले असू शकते आणि ते हाताने किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उघडता येते. सनरूफद्वारे गाडीत ताजी हवा आणि प्रकाश आणता येतो. याचे अनेक प्रकार आहेत, जसे की पॉप-अप सनरूफ, स्लाइडिंग सनरूफ, पॅनोरॅमिक सनरूफ, टिल्ट-अप सनरूफ इ.

मूनरूफ हा मुळात एक प्रकारचा सनरूफ असतो, परंतु तो काचेच्या पॅनेलसह असतो. कधीकधी ते पूर्णपणे उघडले जात नाही, तर फक्त थोडेसे वाकडे होऊ शकते. आतील हवा बाहेर पडू शकेल, यासाठी ते वापरले जाते. आता बहुतेक आधुनिक आणि महागड्या गाड्यांमध्ये हेच दिले जाते. कारण ते अधिक प्रीमियम आणि स्टायलिश दिसते.

सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची निर्मिती आणि कार्यपद्धती आहे. सनरूफ धातू किंवा काचेचे बनवता येतात, तर मूनरूफ नेहमीच काचेचे असतात. सनरूफ मॅन्युअली देखील उघडता येतात.

सनरूफ पूर्णपणे उघडता येतात, ज्यामुळे अधिक ताजी हवा आणि प्रकाश आत येऊ शकतो, तर मूनरूफ सामान्यतः फक्त झुकतात किंवा अंशतः उघडतात.

काही बजेट सेगमेंट कारमध्ये सनरूफ उपलब्ध आहे, तर मूनरूफ बहुतेकदा प्रीमियम आणि लक्झरी कारमध्ये दिसून येते.

जर तुम्हाला गाडीत अधिक ताजी हवा आणि खुल्या छताचा अनुभव हवा असेल तर सनरूफ हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्याच वेळी, जर तुम्हाला फक्त प्रकाश आणि आत थोडी खेळती हवा हवी असेल तर मूनरूफ हा एक उत्तम पर्याय असेल.