टाटा Nano पेक्षा छोटी इलेक्ट्रिक कार! लवकरच भारतात होणार लॉन्च, पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 09:03 PM2023-07-11T21:03:03+5:302023-07-11T21:08:34+5:30

फ्रेंच कंपनी Ligier आपली टू-डोअर इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करत आहे.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या देशांतर्गत कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहेत, तर दुसरीकडे अनेक परदेशी ब्रँड्सही EV सह भारतात एन्ट्री करत आहेत. अलीकडेच, MG मोटरने आपली सर्वात छोटी परवडणारी इलेक्ट्रिक कार MG Comet लॉन्च केली. आता फ्रेंच कंपनी Ligier ची टू-डोअर छोटी इलेक्ट्रिक कार Myli ची भारतात चाचणी सुरू आहे. चाचणीदरम्यान ही गाडी स्पॉट झाली आहे.

तुम्हाला मोटर स्पोर्ट्सची आवड असेल, तर तुम्हाला फ्रेंच कंपनी Ligier ची माहिती असेल. हा ब्रँड सत्तरच्या दशकातील प्रसिद्ध ले मेन्स रेस आणि फॉर्म्युला-वन रेसशीही संबंधित होता. हा ब्रँड छोट्या मोटारींच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. Motorbeam च्या रिपोर्टनुसार, आता कंपनीची मायक्रो इलेक्ट्रिक SUV भारतात टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. कंपनी लवकरच ही कार भारतीय बाजारात लॉन्च करू शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Ligier Myli युरोपीयन बाजारात चार प्रकारात येते. यात गुड, आयडियल, एपिक आणि रिबेल यांचा समावेश आहे. कारची लांबी फक्त 2960 मिमी आहे, ज्यामुळे ही भारतीय बाजारपेठेत सादर केलेल्या Tata Motors च्या Nano पेक्षाही लहान असेल. ही दोन-दरवाजे असलेली कार आहे. याचा व्हीलबेस खूपच लहान असून, 15-इंच अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक मिळतात.

जागतिक बाजारपेठेत, ही कार तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येते. यामध्ये 4.14 kWh, 8.28 kWh आणि 12.42 kWh चा समावेश आहे. कारचा सर्वात लहान बॅटरी पॅक प्रकार 63 किमी, मिडल 123 किमी आणि हाय 192 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. आकाराने लहान असण्यासोबतच ही कार वजनानेही खूप हलकी आहे, कारचे वजन फक्त 460 किलो आहे.

अलीकडेच MG Motors ने MG Comet EV ही त्यांची दुसरी इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली, ज्याची किंमत रु. 7.98 लाखांपासून सुरू होते. Ligier Myli भारतीय बाजारपेठेत आल्यावर एमजी कॉमेटसोबत स्पर्धा असेल. एमजी कॉमेट 17.3kWh बॅटरी पॅकसह येते आणि त्याची इलेक्ट्रिक मोटर 41bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जमध्ये 230 किमी रेंज देते.