Mahindra EV: सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज, लवकरच लॉन्च होणार महिंद्राची इलेक्ट्रिक XUV300 By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:20 PM 2022-02-02T15:20:45+5:30 2022-02-02T15:24:44+5:30
Mahindra EV: लवकरच मार्केटमध्ये महिंद्राच्या XUV300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च होणार असून, याची टक्कर टाटा नेक्सॉन आणि ह्युन्डाईच्या इलेक्ट्रीक व्हिकलसोबत असेल. सध्या सर्वत्र इलेक्ट्रीक वाहनांची चर्चा सुरू आहे. जवळपास सर्वच कंपन्या इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत. पण, एका दशकापूर्वीच महिंद्राने या इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये एंट्री घेतली होती.
ज्यावेळी इलेक्ट्रीक वाहनांची चर्चाही नव्हती, तेव्हा महिंद्राने e20 ही इलेक्ट्रीक गाडी मार्केटमध्ये उतरवली होती. पण, तेव्हा महिंद्राला इलेक्ट्रीक वाहनांची मागणी नसल्यामुळे महिंद्राला यात मोठे यश मिळाले नाही.
तेव्हापासून आजपर्यंत महिंद्राला या सेगमेंटमध्ये मोठे यश मिळवता आले नाही. याउलट टाटा मोटर्स, ह्यून्डाई इंडिया आणि एमजी मोटर इंडियाने इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये आपल्या गाड्या लॉन्च केल्या.
पण, आता महिंद्रा या इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये पुन्हा मोठी मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाले आहे. महिंद्राची लोकप्रिय कार असलेली XUV300 आता नवीन इलेक्ट्रीक अवतारात येणार आहे.
महिंद्राने बॅटरीवर चालणारी ई-व्हेरिटो सेडान लॉन्च केली. या कारला भारतात चांगली पसंती मिळाली आणि सध्या महिंद्राची ही एकमेव इलेक्ट्रीक कार बाजारात उफलब्ध आहे.
मागील ऑटो एक्सपोमध्ये महिंद्राने XUV300 EV च्या प्रोडक्शनापूर्वी तयार केलेल्या EVमॉडेलला सर्वांसमोर आणले होते. कंपनी या नवीन XUV300 इलेक्ट्रिकला 2023 पर्यंत मार्केटमध्ये लॉन्च करू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, XUV300 इलेक्ट्रिक SUV मध्ये 40 किलोवाट-आर बॅटरी पॅक मिळेल, जो 130 बीएचपी शक्ती जनरेट करतो आणि एका चार्जमध्ये 300 किमीची रेंज देऊ शकतो.
नुकताच याचा एक टेस्ट मॉडेल समोर आले होते. ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च झाल्यानंतर याची थेट टक्कर टाटा नेक्सॉन EV, ह्यून्डाईच्या आगामी कार आणि MG च्या स्वस्त इलेक्ट्रिक कारसोबत असेल