'Maruti' नं शोधली त्यांची पहिली कार, दिल्लीचे होते खरेदीदार; पाहा आता काय अवस्था By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:08 PM 2022-08-25T19:08:42+5:30 2022-08-25T19:10:57+5:30
मारुती-800(Maruti 800) ही कार आता रस्त्यावर क्वचितच दिसत असेल, पण एक काळ असा होता जेव्हा भारतीय कार बाजारात ती हिट होती. लहान हॅचबॅक त्या काळातील सर्वात यशस्वी कारपैकी ती एक होती, जेव्हा अनेकांसाठी कार घेणे हे दूरचे स्वप्न होते. बरोबर ३९ वर्षांपूर्वी १९८३ मध्ये ही लॉन्च करण्यात आली होती.
ही कार आता पुन्हा चर्चेत आली आहे, खरं तर, तिचे पहिले युनिट दुरुस्त करून मारुती मुख्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. बिझनेस टुडेच्या मते, लोकप्रिय हॅचबॅक मारुती-800 चे पहिले युनिट त्याच्या मूळ स्वरूपात पुनर्संचयित केले गेले आहे आणि मारुती सुझुकीच्या हरियाणा येथील मुख्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहे.
मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी या कारबद्दल सांगितले की, ज्यारितीने भारताने ७५ वर्षांपूर्वी स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिले पाऊल टाकले होते. त्याचप्रमाणे मारुती सुझुकीने ३९ वर्षांपूर्वी पहिली मारुती-800 कार लॉन्च केली होती.
Maruti-800 त्या काळी ४७ हजार ५०० रुपये (Maruti-800 Price) किमतीत लॉन्च करण्यात आली. त्याचं पहिले युनिट हरियाणात मारुती उद्योग लिमिटेडमध्ये बनवले गेले. हे आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड म्हणूनही ओळखले जाते. मारुतीची ही कार २००४ पर्यंत भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार होती, मात्र २०१० मध्ये कंपनीने तिचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला.
मारूतीनं ८०० बंद करण्याचा निर्णय घेतला कारण कंपनीला त्याऐवजी अल्टो लोकप्रिय करायची होती. यानंतर अखेर १८ जानेवारी २०१४ रोजी त्याचं उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले. मारुती सुझुकीच्या हरियाणा प्लांटमधून बाहेर पडलेली पहिली 800 कार नवी दिल्लीचे रहिवासी हरपाल सिंग यांच्या मालकीची होती.
हरियाणामध्ये उत्पादन सुरू करण्याच्या औपचारिक उद्घाटनाच्या वेळी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते हरपाल सिंग यांना कारच्या चाव्या दिल्या. २०१० मध्ये हरपाल सिंग यांच्या मृत्यूपर्यंत ही कार त्यांच्याजवळ होती. या कारचा नोंदणी क्रमांक DIA 6479 होता. कंपनीने भारतात या कारची २७ लाखांहून अधिक विक्री केल्याची माहिती आहे.
हॅचबॅक मारुती-800 ची मूळ डिझाईन सुझुकी फ्रंट SS80 वर आधारित होती. त्याची पहिली बॅच कॉम्प्लीटली नॉक डाउन (CKD) किट म्हणून आयात केली गेली. हे मॉडेल 796cc, तीन-सिलेंडर F8D पेट्रोल इंजिनचं होतं. जे जास्तीत जास्त 35 BHP पॉवर निर्माण करते. सध्या, हेच इंजिन अल्टो आणि ओम्नी सारख्या कारमध्ये दिसू शकते परंतु कंपनीने त्यात बदल केले आहेत.
दिवंगत हरपाल सिंग यांची मारुती-800 कार पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होती. या कारची काही छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्यात आली होती. यानंतर कंपनीने कार रिस्टोअर करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने कारमधील सर्व मूळ सुटे भाग आणि घटक बसवले. मात्र, ही गाडी आता दिल्लीच्या रस्त्यावर धावू शकत नाही. त्यामुळे कंपनीने भारतातील पहिली यशोगाथा म्हणून आपल्या मुख्यालयात कारचे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.