Maruti Electric Car: मुंबई-पुणे दोनदा जाऊन येऊन करा! मारुतीची पहिली वहिली इलेक्ट्रीक कार येतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:32 PM2022-02-11T18:32:34+5:302022-02-11T18:45:09+5:30

Maruti Suzuki's Electric Car: नव्या रिपोर्टनुसार मारुती एक इलेक्ट्रीक मिड साईज एसयुव्ही लाँच करणार आहे. ही मारुतीची पहिलीच कार असणार असून गुजरातच्या प्रकल्पात या कारची निर्मिती केली जाणार आहे.

मारुती सुझुकी आणि टोयोटाने भारतीय ईव्हींचा बाजार काबीज करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. टाटाची नेक्सॉन ईव्ही लाँच होऊन दोन वर्षे झाली तरी देशातील सर्वात मोठी कंपनी मारुतीला इलेक्ट्रीक कार बाजारात आणता आलेली नाही.

नव्या रिपोर्टनुसार मारुती एक इलेक्ट्रीक मिड साईज एसयुव्ही लाँच करणार आहे. ही मारुतीची पहिलीच कार असणार असून गुजरातच्या प्रकल्पात या कारची निर्मिती केली जाणार आहे. याचबरोबर इतर देशांतही कार निर्यात केली जाणार आहे.

या एसयुव्हीला YY8 कोडनेम देण्यात आले आहे. मारुतीची ही इलेक्ट्रिक कार भविष्यातील डिझाइन लँग्वेजसह येईल जी कंपनीच्या विद्यमान IC इंजिन मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. ही कार स्केटबोर्ड 27PL प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल जी टोयोटाच्या Toyota 40PL ग्लोबल आर्किटेक्चरवर आधारित आहे.

कारची लांबी 4300 मिमी आणि रुंदी 1790 मिमी आणि उंची 1620-1635 पर्यंत असेल. आकारात, तो MG ZS EV सारखा असू शकतो. या कारचा व्हीलबेस 2,700mm असेल. या कारचा आकार लोकप्रिय एसयूव्ही क्रेटापेक्षा मोठा असणार आहे.

मारुती या YY8 इलेक्ट्रिक SUV मध्ये 2WD (टू व्हील ड्राइव्ह) आणि AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) देणार आहे. एंट्री लेव्हल व्हेरियंटमध्ये टू व्हील ड्राइव्ह दिली जाऊ शकते. या कारची टू व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची रेंज 400 किमी असेल आणि फोर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची रेंज 500 किमीपर्यंत असेल.

या कारच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की कंपनी ही कार 13 लाख ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च करू शकते.

भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या Tata Nexon EV शी थेट स्पर्धा करण्यासाठी किमत कमी ठेवण्याची शक्यता आहे.