Seat Belt New Rule: मेटे, मिस्त्री अपघात: नितीन गडकरींची मोठी घोषणा; मागच्यांनाही सीटबेल्ट सक्तीचा, नाहीतर पावती फाडणार... By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:29 PM 2022-09-07T14:29:04+5:30 2022-09-07T14:35:35+5:30
New Seat Belt Rule in three days: असे अपघात नेहमीच होत असतात, परंतू या दोन्ही व्यक्ती राजकीय दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या असल्याने याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे. गेल्या काही दिवसांत दोन मोठ्या अपघातांनी केंद्र सरकारचे विशेषकरून नितीन गडकरींचे लक्ष वेधून घेतले आहे. विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचा दणकट गाड्या असूनही अपघाती मृत्यू झाला होता. कारण ते मागच्या सीटवर बसले होते आणि सीटबेल्ट न बांधल्याने त्यांचे डोके आदळून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तसे पाहता असे अपघात नेहमीच होत असतात, परंतू या दोन्ही व्यक्ती राजकीय दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या असल्याने याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार कंपन्यांना कारमध्ये सहा सीटबेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. असे असले तरी आता सीटबेल्टवरून देखील गडकरींनी मोठे संकेत दिले आहेत. आता त्याचीही तयारी ऑटो कंपन्यांना करावी लागणार आहे. सरकार यासंबंधी तीन दिवसांत आदेश जारी करणार आहे. यामुळे ज्या गाड्यांमध्ये सीटबेल्ट आहेत त्यांना सीटबेल्ट वापरावा लागणार आहे.
सध्या देशात ड्रायव्हरने सीटबेल्ट लावावा असा नियम आहे. त्याचीच पावती फाडली जाते. सुरक्षा हवी असेल किंवा जे जागरुक आहेत, ते सहप्रवाशाला देखील पॅसेंजर सीटबेल्ट वापरण्यास सांगतात. परंतू, सध्यातरी पाठीमागच्या सीटवर बसलेला व्यक्ती सीट बेल्ट वापरत नाही. या सीटवरील प्रवाशांनी सीटबेल्ट वापरले तर अनेकांचे जीव वाचतील. कारण हे सीटबेल्ट या मागच्या सीटवर बेसावध बसलेल्या व्यक्तींना सीटवरच बांधून ठेवतील आणि ते पुढे आदळणार नाहीत.
आता मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तर दंडाची पावती फाडली जाईल, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी मंगळवारी एका खासगी कार्यक्रमात सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. आता हा सीटबेल्टचा नियम नव्हता का? होता तर तो आधीच का नाही लागू करण्यात आला याची माहिती घेऊया...
सध्याच्या तंत्रज्ञानानुसार पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीटबेल्ट लावला नसेल तर अलार्म वाजत राहतो. आता मागच्या सीटवर देखील तशीच सोय केली जाणार आहे. हा नियम लागू झाल्यावर ज्या गाड्या रस्त्यावर येतील त्यात मागच्या सीटखाली वजनाचा सेन्सर असणार आहे. त्या सीटवर कोणी बसले आणि सीटबेल्ट लावला नाही तर अलार्म वाजत राहिल. याबाबतचा आदेश येत्या तीन दिवसांत जारी होईल असेही गडकरी म्हणाले आहेत.
हा आदेश गाडी छोटी असो की मोठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लागू होणार आहे. या गाड्यांमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींना सीटबेल्ट लावणे सक्तीचे होणार आहे. मागच्या सीटवरही बेल्ट लावण्यासाठी क्लिपची व्यवस्था करावी लागेल. अलार्म सिस्टीमही बसवावी लागेल, जी मागे बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास वाजत राहील, असे गडकरी म्हणाले.
हा नियम नव्हता का? 2019 मध्ये मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. त्यात मोटार वाहन कायद्याच्या कलम 194(B)(1) मध्ये तरतूद करण्यात आली होती. यानुसार जो कोणी मोटार वाहन चालवतो किंवा प्रवासी घेऊन जातो, त्याने सीट बेल्ट घालणे बंधनकार असल्याचे म्हटले होते. परंतू, त्यात स्पष्टता नव्हती. यामुळे फक्त ड्रायव्हरच सीटबेल्ट लावण्यासाठी बंधनकारक आहे असे समजले जायचे, त्यानुसार पोलीस पावत्या फाडत होते. हा दंड १००० रुपये होता.
मुलांनाही सेफ्टी बेल्ट... कारमध्ये 14 वर्षांपेक्षा कमी वयाचे कोणी असेल तर त्यानेही सेफ्टी बेल्ट घालणे आवश्यक आहे. एक ते पाच-सात वर्षांच्या मुलाला एक वेगळी आयसोफिक्स सीट येते, ती वापरणे बंधनकारक आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2020 मध्ये सीट बेल्ट न लावल्यामुळे 15,146 लोकांचा मृत्यू झाला. तर 39,102 जण जखमी झाले आहेत.