230 km रेंज अन् दमदार फिचर्स; देशातील सर्वात स्वस्त EV आता आणखी स्वस्त झाली..! पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:39 IST2025-04-09T18:36:14+5:302025-04-09T18:39:23+5:30

MG Comet EV Specifications: तुम्ही EV कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी गमावू नका.

MG Comet EV : JSW MG मोटर इंडियाने अलीकडेच भारतीय बाजारात अपडेटेड Comet EV लॉन्च केली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, ही स्वस्त इलेक्ट्रिक कार आता आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. तुम्ही ही EV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी गमावू नका.

एमजी कॉमेट ईव्हीच्या 2024 मॉडेलवर 45,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंत रोख सवलत, 20 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 5000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत सामील आहे. याशिवाय, एमजी कॉमेट ईव्हीच्या 2025 मॉडेलवरही 40 हजार रुपयांची सूट मिळत आहे. ईव्हीवरील ही ऑफर वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार बदलू शकते.

एमजी कॉमेट ईव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्यात 17.3 किलोवॅट बॅटरी पॅक दिला आहे. ही कार 42 पीएसची पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क निर्माण करते. याशिवाय या कारमध्ये 3.3 किलोवॅटचा चार्जर देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ही कार 5 तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

एमजी मोटर्सच्या या इलेक्ट्रिक कारची रेंज 230 किलोमीटर आहे. ही एमजीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे, जी ब्लॅकस्टॉर्म एडिशनसह लॉन्च करण्यात आली आहे. कॉमेट ईव्हीच्या ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये 10.25 इंच ड्युअल स्क्रीन आहे. एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि दुसरी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी.

या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये कनेक्टेड कार फीचर्स देखील समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी या कारमध्ये मागील पार्किंग कॅमेरा आणि ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.